|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » राष्ट्रकुलसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा

राष्ट्रकुलसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा 

मनप्रीत सिंगकडे नेतृत्व, गोलरक्षक श्रीजेशचे पुनरागमन, सरदार सिंग, रमणदीपला डच्चू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे रंगणाऱया राष्ट्रकुल स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा मंगळवारी केली. या स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश करण्यात आला असून भारतासह पाकिस्तान, मलेशिया, इंग्लंड व वेल्स यांचा समावेश आहे. 7 एप्रिल रोजी होणाऱया सलामीच्या लढतीत भारतासमोर पाकचे आव्हान असेल. दि. 4 एप्रिलपासून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

अझलन शाह हॉकी स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर हॉकी इंडियाने पुन्हा एकदा अनुभवी खेळाडूवर भरवसा दाखवला आहे. अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताची कमान सांभाळणाऱया सरदार सिंगला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या स्पर्धेत सरदारला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. त्याचा फटका सरदारला बसला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हॉकी इंडियाने या महत्वाच्या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा मनप्रीत सिंगकडे संघाची कमान सोपवली आहे. चिंगलेनसाना सिंगकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने गतवर्षी आशिया चषक व वर्ल्ड हॉकी लीगमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती.

विशेष म्हणजे, गतवर्षात सातत्याने दुखापतीने संघाबाहेर असलेल्या अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशचे संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय, ड्रगफ्लिकर रुपिंदरपाल सिंग, वरुण कुमार, कोथाजित सिंग, गुरजंत सिंग, अमित रोहिदास यांचीही संघात वर्णी लागली आहे. श्रीजेशसोबत सहायक गोलरक्षक म्हणून सुरज करकेराची निवड करण्यात आली आहे. सध्या 2020 टोकिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाची संघबांधणी सुरु आहे. यामुळे युवा व अनुभवी खेळाडूंच्या साथीने भारतीय संघ आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत कशी कामगिरी करतो, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष असणार आहे.

भारतीय हॉकी संघ –  गोलरक्षक – पीआर श्रीजेश, सुरज करकेरा. बचावफळी – रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, कोथाजित सिंग, गुरिंदर सिंग, अमित रोहिदास. मध्यफळी – मनप्रीत सिंग, चिंगलसेना सिंग, सुमित, विवेक सागर प्रसाद,  आघाडीफळी – आकाशदीप सिंग, एस. व्ही. सुनील, गुरजंत सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, दिलप्रीत सिंग.

Related posts: