|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगरावर पाकाळणी सोहळा

यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगरावर पाकाळणी सोहळा 

वार्ताहर/ जोतिबा डोंगर

दख्खनचा राजा श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा मंदिरात ‘पाकाळणी’ विधी साजरी करून मंदिर स्वच्छ करण्यात आले. श्रीचे दागदागिने, शस्त्र-अस्त्र, पालखीचे साहित्य, धार्मिक उत्सवाचे साहित्य, चांदीच्या असंख्य वस्तूंची स्वच्छता करण्यात आली.

महाराष्ट्राचे कुलदैवत व आराध्य दैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा. या जोतिबा देवाची चैत्री यात्रा 31 मार्च रोजी होणार आहे. यासाठी जोतिबा डोंगर येथे यात्रा नियोजनाची लगबग सुरू आहे. यासाठी दोन शासकीय अधिकऱयांच्या व इतर सर्व घटकातील प्रतिनिधींची बैठक झाली आहे. सर्वत्र यात्रेसाठी आपआपले योगदान कसे उत्तम होईल यादृष्टीने सर्वजण झटत आहेत.

दरम्यान रूढी परंपरेनुसार चैत्री यात्रेच्या अगोदर व चैत्र यात्रा झाल्यावर पंधरा दिवसांनी मंदिर परिसरात मंदिर स्वच्छसतेची पाकाळणी विधी केली जाते. त्यामुळेच सोमवारी चैत्र यात्रेपूर्वीची पाकाळणी विधी करण्यात आली. स्वच्छ पाण्याचे फवारे मारून मंदिराची स्वच्छत करण्यात आली. सकाळी मंदिरात स्थानिक पुजारी, खंडकरी यांनी जोतिबा, महादेव, नंदी, चोपडाई, काळभैरव, यमाई, रामलिंग, दत्त, मंदिरातील देवता, कृत्य साहित्याची स्वच्छता करून मंदिर परिसर चकाचक केला. दीपमाळ, दगडी कमान, शिखर, सदर यांच्यावर पाण्याचे फवारे मारून स्वच्छ करण्यात आले. तसेच पालखी व धुपारती सोहळय़ाचे साहित्याची स्वच्छता करण्यात आली.

वारणा उद्योग समूहाकडून पाण्याचा टँकर पुरवठा करण्यात आला. मंदिरातील देवसेवक, देवस्थान समिती, बी. व्ही. जी ग्रुप तसेच गवातील ग्रामस्थ पुजारी, तरूणवर्ग, खंडकरी मोठय़ा संख्येने या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

दरम्यान, याचबरोबर मंदिराची रंगरंगोटीचे काम केले जात आहे. वाहन पार्किंगसाठी जागेचे सपाटीकरण काम युध्दपातळीवर सुरू आहे. मंदिर परिसरातील दगडी फरशीची डागडुजी होत आहे. व्यापारीवर्ग दुकान उभारणी, माल भरणी करत आहेत. नारळ, गुलालाचे ट्रक जोतिबा डोंगरावर येत आहेत. जोतिबा ग्रामपंचायतीने गावामध्ये स्वच्छता करण्यास सुरूवात केली आहे. पुजारी, ग्रामस्थवर्गाने घराची, अंगणाची स्वच्छता करण्यास सुरूवात केली आहे. भाविकांच्या सोईसुविधांसाठी द्रोण, पत्रावळय़ा, नैवेद्याचे साहत्य, गॅस व त्यांच्या राहण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामस्थ पुजारीवर्ग झटत आहे.

Related posts: