|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंबईत धावल्या 25 हायब्रीड बसेस

मुंबईत धावल्या 25 हायब्रीड बसेस 

प्रतिनिधी मुंबई

पहिल्यांदाच भारतातील मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादित पहिली अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज 25 हायब्रीड बसेस शुक्रवारपासून मुंबईच्या रस्त्यावर धावल्या. एमएमआरडीएने खरेदी केलेल्या या बसेसचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या बसेस बेस्टला चालवण्यासाठी दिल्या आहेत. सध्या सकाळी 7.30 ते 8.30 आणि सायं. 6 ते 7 या वेळेत बीकेसी-ठाणे, नवी मुंबई- कांदिवली या मार्गावर बसेस धावणार आहेत

या वातानुकूलित, वायफाय आरामदायी हायब्रीड बसमधून प्रवाशांना कामही करता येणार आहे. येत्या काळात शंभर टक्के इलेक्ट्रिक मोबिलीटीवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून, भविष्यात सर्व बसेस या इलेक्ट्रिकवर चालविल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पेंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयामार्फत फेमा इंडिया या विशेष योजनेतून एमएमआरडीएला या बसेससाठी अनुदान दिले आहे. हायब्रीड बसेमुळे 30 टक्क्यांपर्यंत प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. बेस्टला याआधी 40 इलेक्ट्रिक बसेस दिल्या आहेत. लवकरच आणखी 80 बसेस देण्यात येणार असल्याचेही पेंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सांगितले.

यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यु. पी. एस. मदान, सहआयुक्त प्रवीण दराडे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, गिरीश व्यास उपस्थित होते.

 

 हायब्रीड बसची वैशिष्टय़े

केंद्र सरकारकडून 15 कोटीचे अनुदान

25 बसेससाठी 50 कोटी

31 अधिक 1 अशा आसनक्षमतेच्या 25 बसेस

टीव्ही, वायफाय, जीपीएस, सीसीटीव्ही

दिव्यांगासाठी व्हीलचेअर

गिअरलेस व क्लचलेस कार्यपद्धती