|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शस्त्रास्त्र तस्करी, अवैध वित्तपुरवठय़ात ‘डी कंपनी’चा हात : अमेरिका

शस्त्रास्त्र तस्करी, अवैध वित्तपुरवठय़ात ‘डी कंपनी’चा हात : अमेरिका 

मेक्सिकन ड्रग माफियासारखे स्वरुप : दाऊदच्या टोळीचे अनेक देशांमध्ये अवैध धंदे

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

दाऊद इब्राहिमची डी-कंपनी अंमली पदार्थांसोबतच अनेक अवैध धंद्यांमध्ये सहभागी असल्याचे अमेरिकेच्या जॉर्ज मेसन विद्यापीठाया शार स्कूल ऑफ पॉलिसीचे प्राध्यापक डॉ. लुइस शैली यांनी स्पष्ट केले. ते दहशतवाद आणि बेकायदेशीर वित्तपुरवठय़ावर संसदेच्या वित्तीय सेवा उपसमितीसमोर बोलत होते. डी-कंपनीने अंमली पदार्थांसोबतच शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि हवालाद्वारे वित्तीय सेवा पुरविणे देखील सुरू केल्याचे ते म्हणाले. 1993 च्या मुंबईतील साखळी स्फोटांसमवेत भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी दाऊद इब्राहिम मुख्य गुन्हेगार आहे.

अनेक कारवायांमध्ये सहभाग

पाकिस्तानस्थित दहशतवाद आणि गुन्हेगारी संघटना डी-कंपनीचा उदय भारतात झाला. या गुन्हेगारी टोळीचा कराचीपर्यंत फैलाव झाला असून पाकिस्तानचे हे शहर अंमली पदार्थांच्या तस्करीचे मुख्य केंद्र ठरले आहे. दाऊदची टोळी अंमली पदार्थांच्या तस्करीतील सर्वात शक्तिशाली आंतरराष्ट्रीय आणि दहशतवादी संघटना झाली आहे. मेक्सिकन ड्रग माफियाप्रमाणे डी-कंपनीने देखील अनेक अवैध धंद्यांमध्ये प्रवेश केला आहे. ही टोळी आता शस्त्रास्त्रांची तस्करी, नकली डीव्हीडी आणि हवालाद्वारे वित्तीय सेवा पुरवीत असल्याचे शैली यांनी म्हटले. दाऊद टोळीचे अवैध धंदे अनेक देशांमध्ये पसरल्याची माहिती त्यांनी दिली.

काबूल हल्ल्यांशी पाक कनेक्शन

अलिकडेच काबूलमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यांचे नियोजन पाकिस्तानातील दहशतवादी आश्रयस्थानांमध्ये झाले आणि त्यांना तेथूनच मूर्त रुप देण्यात आल्याचे विधान प्राध्यापक सेलीना बी रालूयो यांनी उपसमितीसमोर केले. अफगाण अधिकाऱयांनुसार 2018 मध्ये असे अनेक हल्ले करण्यात आले. 20 जानेवारी रोजी 4 अमेरिकनांसोबत 22 जण काबूलच्या एका हॉटेलवरील हल्ल्यात मारले गेले. काबूलमध्ये एका आत्मघाती स्फोटात 100 पेक्षा अधिक जण मारले गेले होते.

जागतिक दहशतवादी घोषित

अमेरिकेने 2003 मध्ये दाऊदला जागतिक दहशतवादी घोषित केले. दाऊदचे अल कायदासोबत संबंध असल्याचे देखील अमेरिकेने मान्य केले आहे. दाऊदने पाकिस्तानात कराची येथे आश्रय घेतला असून त्याच्याकडे पाकिस्तानी पारपत्र असल्याचे देखील अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

दाऊद पाकिस्तानातच

दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असून विविध शहरांमध्ये त्याची 5 घरे असल्याचा खुलासा दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने पोलिसांच्या चौकशीवेळी केला होता. दाऊदची पत्नी मेहजबीन 2016 मध्ये स्वतःच्या वडिलांना भेटण्यासाठी मुंबईत आली होती अशी माहिती देखील त्याने दिली. फोन टॅपिंगच्या भीतीने दाऊद भारतातील नातेवाईकांशी संपर्क ठेवत नसल्याचे त्याने सांगितले.

 

साखळी स्फोटांचा आरोपी

1993 मधील मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांप्रकरणी दाऊद मुख्य आरोपी आहे. स्फोटानंतर तो भारतातून फरार झाला होता. या स्फोटांमध्ये 260 जणांचा मृत्यू झाला तर 700 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते.

? दाऊदबद्दल भारताने अनेकदा पाकला डोजियर सोपविले आहेत. दाऊदचा पाकिस्तानातील पत्ता देखील भारताने उपलब्ध केला आहे. परंतु दाऊद तेथे नसल्याचा दावा पाक करतोय.

? दाऊदचे नाव इंटरपोलच्या मोस्ट वाँटेड यादीत समाविष्ट आहे. त्याच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट, संघटीत गुन्हेगारी टोळी चालविण्याचा आरोप आहे. अमेरिकेने 2003 मध्ये त्याला जागतिक दहशतवादी ठरविले.