|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जनतेचे आरोग्यच आता ‘राम भरोसे’

जनतेचे आरोग्यच आता ‘राम भरोसे’ 

जिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांपासून वर्ग तीन, वर्ग चारचीही मोठय़ा प्रमाणात पदे रिक्त आहेत. सीटी स्कॅन मशीन, एक्स-रे मशीन, आयसीयू युनिट, इसीजी मशीन, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन या मशिनरी नादुरुस्त आहेत. रत्नागिरी जिल्हय़ातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे जनतेला आरोग्याचे प्रश्न वारंवार भेडसावत आहेत.

 

आरोग्यसेवेच्या प्रश्नावर सिंधुदुर्ग जिल्हय़ात दोडामार्ग तालुक्यातील जनतेचे  जनआक्रोश आंदोलन सलग आठ दिवस सुरू आहे. खरेतर आरोग्य सेवेचा प्रश्न दोडामार्गपुरता नाही, तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्हय़ाना भेडसावत आहे. तज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि नादुरुस्त मशिनरी यामुळे सातत्याने आरोग्यसेवेचा दर्जा खालावत चालला आहे. सरकार मात्र या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही, हे जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यामुळे भविष्यात आरोग्यसेवेच्या प्रश्नावर दोन्ही जिल्हय़ात मोठे आंदोलन उभे राहिल, हे निश्चित.

सिंधुदुर्ग जिल्हय़ात सरकारी किंवा खासगी अद्ययावत अशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे जिल्हय़ातील जनतेला गोवा-बांबोळी मेडिकल कॉलेजवरच अवलंबून राहावे लागते. यापूर्वी मोफत सेवा मिळत होती. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना न परवडणाऱया खासगी हॉस्पिटलऐवजी बांबोळी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेणेच सोयीचे ठरत होते. परंतु गोवा सरकारने मोफत आरोग्य सेवा देणे बंद केल्याने गोरगरीब रुग्णांची कमालीची परवड होऊ लागली आहे. या प्रश्नावर सिंधुदुर्ग जिल्हय़ातील जनतेने अनेकवेळा सरकारचे लक्ष वेधले. मात्र त्यावर कोणतीच ठोस उपाययोजना होऊ शकली नाही. म्हणूनच दोडामार्ग तालुक्यातील जनता आरोग्यसेवेच्या प्रश्नावर एकत्र आली आणि तालुक्यातील सर्व सरपंचांची कोअर कमिटी स्थापन करून जनआक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

जनआक्रोश आंदोलन करताना महत्त्वाचे चार मुद्दे ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये मोफत उपचार मिळावेत, दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, माकडताप रुग्णांना मोफत सेवा मिळावी आणि जिल्हय़ात स्वतंत्र शासकीय मेडिकल कॉलेज व्हावे या चार मागण्यांचा समावेश आहे.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पाहिल्या, तर त्या केवळ दोडामार्ग पुरत्या मर्यादित नाहीत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्हय़ातील जनतेला लागू होणाऱया आहेत. कारण दोन्ही जिल्हय़ात आरोग्यसेवेचे तेच प्रश्न आहेत. तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने जिल्हय़ाबाहेरच उपचारासाठी जावे लागत आहे. त्यामुळे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये मोफत उपचार मिळायलाच हवेत. त्याही पुढे जाऊन जिल्हय़ातील रुग्णांना जिल्हय़ातच उपचार व्हावेत, यासाठी जिल्हय़ात स्वतंत्रपणे शासकीय मेडिकल कॉलेज व्हायलाच पाहिजे, तरच आरोग्यसेवेचा प्रश्न सुटणार आहे.

 कर्नाटकमधील शिमोगानंतर गोवा आणि आता सिंधुदुर्गात शिरकाव केलेल्या माकडतापाचाही ज्वलंत प्रश्न उद्भवला आहे. माकडतापाची ही साथ हळूहळू पुढे पुढे सरकत असून दोडामार्ग, सावंतवाडीनंतर कुडाळ तालुक्यातही माकडतापाचे रुग्ण सापडले आहेत. भविष्यात रत्नागिरी जिल्हय़ातही माकडताप शिरकाव करू शकतो. या माकडतापामुळे सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील अनेक लोकांचे बळी गेले. परंतु या माकडतापावर प्रतिबंधात्मक उपाययोजना मात्र सरकारकडून होऊ शकल्या नाहीत. अनेक लोकांना माकडतापाची लागण झाली आणि काही रुग्ण बरेही झाले. परंतु त्यातील बहुतांश रुग्णांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेतले आहेत. म्हणूनच आताही माकडतापाचे रुग्ण सापडल्यानंतर गोवा मेडिकलला जातात, पण मोफत उपचार होत नाहीत. गोरगरीब रुग्ण त्यामुळे जाण्यास बघत नाहीत. त्यामुळे माकडतापाच्या रुग्णांनाही मोफत उपचार मिळावेत, ही मागणी रास्त आहे.

स्वतंत्र दोडामार्ग तालुका निर्माण होऊन अनेक वर्षे झाली. मात्र या तालुक्याला मिळणाऱया सेवा अद्यापही पूर्णपणे मिळत नाहीत. सावंतवाडी तालुक्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. हा तालुका थोडासा एका बाजूला असल्याने दुसऱया तालुक्यात येण्याजाण्यासाठी थोडय़ाफार अडचणी येतात. त्यामुळे दोडामार्ग तालुका ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा म्हणून करण्यात आलेली मागणीही योग्यच म्हणावी लागेल.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ाच्या विकासासाठी कोटय़वधींचा निधी येत असल्याचे सत्ताधाऱयांकडून वारंवार सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हय़ाची आरोग्य यंत्रणा वाऱयावर सोडून दिल्याचे वारंवार निदर्शनास येते आणि तेही कोकणचे सुपुत्र डॉ. दीपक सावंत राज्याचे आरोग्य मंत्री असूनसुद्धा. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय हे तर जिल्हय़ाच्या आरोग्यसेवेचे नाक आहे. मात्र तेच रुग्णालय प्राथमिक तपासणी करून रुग्णांना गोव्याला हलविण्याचा सल्ला देण्यातच जास्त प्रसिद्ध असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. सुविधांची वानवा असलेल्या या रुग्णालयास संजीवनी देण्यापेक्षा मेडिकल कॉलेजची आश्वासनेच जनतेला ऐकावी लागत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता येऊन तीन वर्षे उलटूनही जिल्हा रुग्णालयाची वाटचाल अधिकच खडतर होत असलेली दिसून येत आहे.

आरोग्याचा प्रश्न दोन्ही जिल्हय़ाना भेडसावत आहे. आता तो फक्त दोडामार्ग तालुक्याच्या जनतेने उचलून धरला आहे. सलग आठ दिवस त्यांनी जनआक्रोश आंदोलन सुरू ठेवले आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये कोणतेही राजकारण न आणता सर्वपक्षीय लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये मोफत रुग्ण सेवा देण्यासाठी दोन कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आल्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. परंतु अशा घोषणांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत प्रत्यक्षात आर्थिक तरतूद होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका जनतेने घेतली आहे. यावरून जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही, हेच दिसून येते. खा. विनायक राऊत यांनीही आंदोलनाला भेट दिली. परंतु जनआक्रोश आंदोलनकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रक्रम देणे आवश्यक आहे. तरच जिल्हय़ाच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे.