|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवसेनेचा म. ए. समिताला पाठिंबा

शिवसेनेचा म. ए. समिताला पाठिंबा 

बेळगाव / प्रतिनिधी :

शिवसेना आगामी विधानसभा निवडणुक कर्नाटकामध्ये लढविणार आहे. मात्र सीमाभागात शिवसेनेचा एकही उमेदवार उभा करणार नाही. म. ए. समिती जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठिशी शिवसेना असेल असे मत सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. पण याचप्रमाणे सीमाभागात अन्य पक्षांनी देखील आपले उमेदवार उभे करू नयेत असे आवाहन केले.

बेळगाव लाईव्ह या वेब पोर्टर सोशल मिडियाचा वर्धापन दिनाचा सोहळा गुरूवारी रामनाथ मंगल कार्यालय येथे पार पडला. याठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय राऊत यांनी मार्गदर्शन करताना आपले मनोगत व्यक्त केले. सीमाप्रश्नाच्या प्रत्येक लढय़ात शिवसेना आग्रही असते. सीमाप्रश्नासाठी केवळ निवडणुकापुरते एकत्र येऊन चालणार नाही. तर अखेरचा भीमटोला देणे आवश्यक आहे. याकरिता शरद पवार किंवा कोणीही नेत्याने नेतृत्व करावे. सीमाप्रश्नासाठी शिवसेना आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी उभा राहील, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

सीमाप्रश्नाची लढाई कशी सुरू आहे. याबाबत आपल्याला चांगलीच माहिती आहे. सीमाप्रश्नासाठी रक्ताचा सडा शिवसेनेने पाढला. मनाने आणि कृतीने शिवसेना सीमावासीयांच्या पाठिशी आहे. सीमाभागातील सीमा बांधवांना खर्चटले तरी त्याचे पडसाद  महाराष्ट्रात उमटतात. हे केवळ शिवसेनाच करू शकते. सीमाप्रश्नासाठी 67 हुतात्मे शिवसेनेने दिले आहेत. यामुळे सीमाप्रश्नाबाबत जाग आहे, चिड आहे, आणि संतापही आहे. सीमाप्रश्न सुटावा याकरिता शिवसेना सतत धडपडत असते. लोकशाही आणि ठोकशाही या दोन्ही मार्गाने सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. यामुळे आता अखेरचा भीमटोला देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षिय खासदार, आमदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांच्या घराच्या दरवाजाजवळ जाऊन धरणे धरून सीमाभाग केंद्रशाशित करावा, अशी मागणी केल्यास हा प्रश्न नक्कीच सुटेल. तसेच सीमाभागातील मराठी भाषेचे संरक्षण होईल, असेही खासदार राऊत यांनी सांगितले. सीमाप्रश्नासाठी सीमाभागात एकही उमेदवार देत नाही. सीमाप्रश्नासाठी भाजप व काँग्रेसने  सीमाभागात उमेदवार देऊ नयेत. पण भाजप किंवा काँग्रेस अशी भुमीका घेत नाही.  असा खरपूस समाचार राऊत यांनी घेतला. येत्या निवडणुकीत एकही मत फुटणार नाही. याचा निर्धार मराठी भाषिकांनी करावा, इतकी वर्षे चाललेला हा लढा पाहता  म. ए. समितीशी गद्दारी करणाऱयांना लाज वाटली पाहिजे. असे सांगून सीमाप्रश्नासाठी शिवसेना सदैव म. ए. समितीच्या पाठिशी राहिल, असे आश्वासन खासदार संजय राऊत यांनी दिले.