|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भारत-अमेरिका व्यापाराची नवी सुरूवात

भारत-अमेरिका व्यापाराची नवी सुरूवात 

केंद्रिय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

अमेरिकेतील पहिले गॅसवाहू जहाज एलएनजी जेटीवर

जहाजावरील गॅस उतरवण्याचा शुभारंभ

सत्यवान घाडे/गुहागर

गेल इंडियाच्यावतीने अमेरिकेजवळ गॅस वाहतुकीचा दीर्घकाळासाठी नवीन करार करण्यात आला असून त्या अंतर्गत पहिले गॅसवाहू जहाज दाभोळमधील आरजीपीपीएलच्या एलएनजी जेटीवर पोहोचले आहे. या जहाजावरील गॅस प्रकल्पस्थळी उतरवण्याचा आजपासून शुभारंभ झाला असून भारत व अमेरिकेची उर्जा भागीदारी व व्यापाराची ही नवी सुरूवात असल्याचे प्रतिपादन केंद्रिय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.

रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील गेलच्या एलएनजी जेटीवर अमेरिकेतून आलेल्या पहिल्या गॅसवाहू जहाजाचे स्वागत तसेच जहाजामधील गॅस प्रकल्पस्थळी उतरवण्याचा शुभारंभ केंद्रिय पेट्रोलियम मंत्री प्रधान यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रधान पुढे म्हणाले, गेलने अमेरिकेजवळ दीर्घकाळासाठी गॅसवाहतुकीचा करार केला आहे. त्यानुसार अमेरिकेतून पहिल्यांदा स्वस्त दराचा एलएनजी गॅस दाभोळमध्ये आला आहे. गेलचे चेअरमन बी. सी. त्रिपाठी 6 मार्चपासून हे गॅसवाहू जहाज दाभोळ येथे आणण्यासाठी प्रयत्नशील होते. तब्बल 24 दिवसानंतर हे जहाज दाभोळमध्ये पोहोचले आहे. याद्वारे कोकण एलएनजी प्रा. लि. या कंपनीच्या रूपाने या व्यवसायाचा विस्तार वाढवण्याची संधी मिळाली आहे. समुद्रातील ब्रेक वॉटरचे काम पूर्ण करून या प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येणार असून ज्याद्वारे 12 महिने गॅस उपलब्ध होईल. या प्रकल्पातून मुंबई-गुजराथ, साऊथमधून बेंगलोरपर्यंत गॅस पुरवठा केला जात आहे. गेलने दीर्घकाळासाठी केलेल्या करारामुळे महिन्यातून 2 ते 3 जहाजे या ठिकाणी येतील व पुढील 2 ते 3 वर्षात 12 महिने एलएनजी जहाजे या ठिकाणी येतील. या प्रकल्पाची गॅस साठवण क्षमता 5 वरून 10 मिलियन टन केली जाणार आहे. यासाठी 3 हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे.

यामुळे भारत व यूएसमधील द्विपक्षीय व्यापार वाढीस लागणार आहे. 2018-19 साली गेल अमेरिकेकडून प्रतीवर्षी सुमारे 2 बिलियन किंमतीचा एलएनजी मिळवणार आहे. येणाऱया काळात जगातील एलएनजीची उपलब्धता पाहून या स्वस्त गॅसचा वापर घरगुती इंधन, उद्योग व्यवसाय, शेती, वीज, पेट्रोकेमिकल यांच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. पुढील काळात दाभोळ हे पश्चिम भारतातील नवीन मोठे उर्जास्त्राsत ठरेल, या दिशेने ही वाटचाल असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

‘रिफायनरी’ची सद्यस्थिती माहितीच नाही!

धर्मेद्र प्रधान यांचे आश्चर्यकारक स्पष्टीकरण

जिल्ह्यात आशियातील सर्वात मोठय़ा, सुमारे तीन लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीतून उभ्या रहात असलेल्या राजापूर-नाणार येथील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कंपनीबाबत खुद्द केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान स्वतःच अनभिज्ञ आहेत. शुक्रवारी गुहागर दौऱयात पत्रकारांच्या प्रश्नावर रिफायनरीच्या सद्यस्थितीबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे आश्चर्यकारक स्पष्टीकरण देत सुरू असलेल्या गोंधळात त्यांनी अधिक भर टाकली आहे.

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेची तळय़ात-मळय़ात असलेली भूमिका, प्रकल्प रेटून नेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस यांची टाकलेली पावले आणि प्रकल्प रद्दबाबत उलट-सुलट वक्तव्ये या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गुहागर दौऱयावर आलेल्या पेट्रोलियम मंत्री प्रधान यांना याबाबत पत्रकारांनी छेडले असता त्यांच्याच मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या या रिफायनरीबाबत त्यांनी केलेले विधान बुचकळय़ात टाकणारे आहे.

पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, कोकण किनारपट्टीवर एच. एनर्जी ही नवीन एलएनजी गॅस व्यवसाय करणारी कंपनी येत आहे. देशातील गॅसची उपलब्धता वाढवण्यासाठी अशाचप्रकारच्या कंपन्या कोकण किनारपट्टीवर येतच राहणार आहेत. नाणारच्या सद्यस्थितीबाबत आपल्याला काहीही माहीत नाही असे सांगून पेट्रोलियम मंत्री प्रधान यांनी याबाबत बोलणे टाळले.