|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » .. हे सारे दर्जेदार रस्त्यांसाठी!

.. हे सारे दर्जेदार रस्त्यांसाठी! 

बांधकाम खात्याच्या अधिक्षक अभियंत्यांचा खुलासा

उद्योजक किरण सामंत यांचे सारे आरोप फेटाळले

प्रतिनिधी /रत्नागिरी

राष्ट्रीय महामार्ग दर्जाचे रस्ते बनवण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी रस्ते बनवण्याच्या खर्चाचा प्रकल्प अहवाल राज्य दर सूचीवर आधारित राहून सादर केला आहे. दहा वर्षे देखभाल दुरुस्तीसह प्रतिकिलोमिटर 2.02 कोटी रुपये एवढा सरासरी खर्च अपेक्षित धरला आहे. हा खर्च रास्तच असल्याचे ठाम प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता शरद राजभोज यांनी केले आहे.

कोकणातील प्रसिद्ध रस्ते व बांधकाम कंत्राटदार किरण सामंत यांनी अलिकडेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांवर अनेक आक्षेप घेतले होते. त्यामध्ये रस्ता बांधणीसाठी वाढीव खर्च हा मुद्दा त्यांनी नमूद केला होता. या संदर्भात त्यांचे म्हणणे माध्यमातून प्रसिद्ध झाले होते.

यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिक्षक अभियंता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे खुलासा दिला आहे. या खुलाशात नमूद करण्यात आले आहे की, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यासाठी सरासरी 2.02 कोटी रुपये एवढा खर्च प्रतिकिलोमीटर कामासाठी अपेक्षित ठेवण्यात आला आहे. हा खर्च दहा वर्ष देखभाल दुरुस्तीसह असल्याने तो रास्त आहे, असे म्हणत सामंत यांचे सर्व आक्षेप फेटाळून लावण्यात आले आहेत.

या खुलाशात नमूद करण्यात आले आहे की, अंदाजपत्रकामध्ये तरतूद आहे की, उद्योजकाने प्रकल्पाचे काम दोन वर्षात पूर्ण करावे आणि पुढील दहा वर्षे रस्त्याची देखभाल दुरुस्ती स्वखर्चाने करावी. बांधकाम कालावधी पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षाने मायक्रोसील सरफेसींग व 7 वर्षाने बिटूमिनस काँक्रिटद्वारे नूतनीकरण करावे, बांधकाम कालावधीत प्रकल्पाच्या 60 टक्के रक्कम शासनाकडून अदा करण्यात येणार असून उर्वरित रकमेपैकी दर 6 महिन्यांनी प्रकल्प पूर्ततेनंतर ठराविक रक्कम अदा करण्यात येणार आहे. शासनाने नियुक्त केलेल्या सल्लागारामार्फत दरसूची तयार झाली असून त्याप्रमाणेच हे ठरवण्यात आले आहे, असे अधिक्षक अभियंता शरद राजभोज यांनी म्हटले आहे.