|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राजस्थानातील तणाव कायम

राजस्थानातील तणाव कायम 

दोन दलित नेत्यांची घरे पेटविली : शॉपिंग मॉलवर हल्ला, बंदचे हिंसक पडसाद उमटले

वृत्तसंस्था/ करौली

एससी-एसटी कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात देशव्यापी भारत बंदचा प्रभाव मंगळवारी देखील काही भागांमध्ये दिसून आला आहे. राजस्थानच्या करौलीमध्ये दोन दलित नेत्यांची घरे जाळण्यात आल्याचे वृत्त आहे. राजस्थानच्या करौलीमध्ये भाजपच्या दलित आमदार राजकुमारी जाटव आणि माजी मंत्री भरोसीलाल जाटव यांचे घर पेटवून देण्यात
आले.

या घटनेवेळी परिसरात सुमारे 40 हजार लोक जमा झाले होते, या जमावानेच हा हल्ला केला आहे. सोमवारच्या भारत बंददरम्यान निदर्शकांनी बसमधून प्रवास करणाऱया महिलांची छेड काढली होती. याच्या विरोधात संतप्त जमावाने दलित नेत्यांची घरे पेटवून दिली. घराबाहेर उभी असलेली वाहने देखील पेटवून देण्यात आली. याचबरोबर शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये तोडफोड करण्यात आली. बिघडलेली स्थिती पाहता शहरात संचारबंदी लागू करण्यात आली.

परीक्षा पुढे ढकलल्या

दोषींची ओळख पटवून लवकरच अटक केली जाईल. संचारबंदी लागू केल्यावर स्थिती नियंत्रणात आली असून सीआरपीएफ आणि आरएएफची तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचालक आलोक वशिष्ठ यांनी दिली. तणाव पाहता आज सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. महाविद्यालयीन परीक्षा 2 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

करौलीत लुटीच्या घटना

सोमवारी करौलीच्या हिंडोनसिटीमध्ये बंददरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. बंद समर्थकांनी बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात लुटपाट करत अनेकांना मारहाण केली होती. या प्रकारामुळे पूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. बंद समर्थक जमावाने निदर्शनावेळी पोलिसांवर देखील दगडफेक केली. तसेच अनेक एटीएमची तोडफोड करत त्यातील रक्कम पळविल्याचे समजते. सोमवारी झालेल्या हिंसाचारात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला होता. तर संघर्षात 40 जण जखमी झाले होते.