|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्जमाफीपेक्षा शेतीमालाला हमीभाव गरजेचा

कर्जमाफीपेक्षा शेतीमालाला हमीभाव गरजेचा 

प्रतिनिधी/ सांगली

नाम फौंडेशनचा राजकारण, शासनाशी कोणताही संबंध नाही. लोकसहभागाच्या माध्यमातून दुष्काळ निर्मूलनासाठी सुरु केलेली ही एक सामाजिक चळचळ आहे असे स्पष्ट मत प्रसिध्द अभिनेते तथा नाम फौंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी येथे बोलताना व्यक्त केले. कर्जमाफी हा अंशतः उपाय आहे, शेतकऱयांना खरोखरच सक्षम करायचे असेल तर स्वामिनाथन यांच्या शिफारशीनुसार शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याची गरज आहे, तरच शेतकऱयांच्या जीवनात प्रकाश निर्माण होईल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

जिल्हा प्रशासनाच्या वतीने मकरंद अनासपूरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हापुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तुषार ठोंबरे आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, नाम फौंडेशनची स्थापना केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबांना 15 हजार रुपयांची मदत देत असताना अनेक कडवट टीका करण्यात आल्या. यावर मात करीत नाम फौंडेशनचे काम संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे.

388 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

अडीच वर्षापासून दुष्काळ निर्मूलनाचे काम सुरु आहे. गेल्यावर्षी सांगली जिह्यातील आटपाडी, जत यासारख्या दुष्काळी तालुक्यातील 20 गावात नाम फौंडेशनच्यावतीने जलसंधारणाची कामे करण्यात आली. परिणामी या परिसरातील सुमारे 388 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. शेतकऱयांना जिथे एक पिक घेण्याची वानवा होती. तिथे आता तीन पिके घेतली जात आहेत. या वर्षीही जलसंधारणाच्या कामासाठी जिह्यातील 50 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 13 गावांत कामे सुरु करण्यात आली आहेत. आटपाडी येथीत माणगंगा नदीचे पुनर्जावन करण्यात आले. आज तिथे बोटींग सुरु आहे, ही नाम फौंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कामाचे यश आहे. ज्या गावात जलसंधारणाची कामे झाली आहेत, ती गावे टँकरमुक्त झाली आहेत.

कर्जमाफी पेक्षा हमीभाव महत्वाचा

कर्जमाफी बाबत बोलताना अनासपूरे म्हणाले, कर्जमाफी हा अंशतः उपाय आहे.  या पेक्षा त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला हमीभाव मिळाला तर शेतकऱयांच्या आयुष्यात खऱया अर्थाने प्रकाश निर्माण होईल. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, अशी आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी नाम फौंडेशनच्या माध्यमातून शेतकऱयांच्या पाठीशी ठामपणे उभा राहू. हमीभावाची मागणी अवास्तव नसून तो शेतकऱयांचा हक्कच आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.