|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘एनएचएम’ कर्मचाऱयांचा जि. प.वर मोर्चा

‘एनएचएम’ कर्मचाऱयांचा जि. प.वर मोर्चा 

आज काळय़ा फिती लावून हजेरी, मात्र कामबंद : 13 पासून बेमुदत कामबंद

प्रतिनिधी / ओरोस:

सलग दहा ते बारा वर्षे सेवा करूनही पुनर्नियुक्ती प्रक्रियेत वेळोवेळी होणाऱया बदलाविरोधात राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱयांनी लढा उभारला आहे. शासनसेवेत बिनशर्त समायोजित करावे, ‘समान काम, समान दाम मिळावेयासाठी बुधवारी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 12 रोजी काळय़ा फिती लावून हजेरी लावणार, मात्र काम केले जाणार नाही. तर 13 पासून जि. . च्या गेटसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सन 2005 पासून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाला शासनाने 2020 पर्यंत अभय दिले आहे. मात्र या अंतर्गत कार्यरत कर्मचाऱयांना कंत्राटी पद्धतीने पुनर्नियुक्ती देण्याच्या पद्धतीत बद्दल केलेला नाही. दरम्यान पुनर्नियुक्ती देताना शासनाकडून वेळोवेळी वेगवेगळय़ा जाचक अटी लादल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सद्यस्थितीत कर्मचाऱयांच्या कामांच्या मूल्यांकनानुसार पुनर्नियुक्ती देण्याबाबतची अट घालण्यात आली आहे. या अटीला या कर्मचाऱयांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

मूळात ज्या कामासाठी नियुक्त्या देण्यात आल्या, त्या व्यतिरिक्त कितीतरी जादा काम करून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कमी मोबदल्यात अतिरिक्त कामे करताना मूळ कामाकडे लक्ष देणे जिकीरीचे होत आहे. त्यातच कामाचे मूल्यांकन होणार असल्याने नेमके कोणते काम करावे, याबाबतही संभ्रमावस्था आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा केलेल्या कर्मचाऱयांना कंत्राटी पदावरून नियमित सेवेत समायोजित करून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान सरळ सेवेत भरती करून समायोजन करताना वयाची अट शिथील करावी. कोणत्याही कर्मचारी वा अधिकाऱयाला कोणत्याही कारणासाठी कमी करू नये. आरोग्य विभागाच्या नियमित कर्मचाऱयांएवढेच काम होत असल्याने समान वेतन देण्यात यावे. महिला कर्मचाऱयांना 180 दिवस पगारी प्रसुती रजा मंजूर करावी. जिल्हांतर्गत बदली धोरण लागू करावे. सलग तीन वर्षे चांगले काम करणाऱया कर्मचाऱयांना मूल्यांकनातून सूट द्यावी. आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांना मासिक वेतन देण्यात यावे. विमा संरक्षण लागू करावे. प्रवासभाडे, मोबाईल भत्ता मिळावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

जि. . आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांनी या समस्यांबाबत आरोग्य संचालकांचे लक्ष वेधले असून कर्मचाऱयांच्या मागण्या सोडविण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमदीप पाताडे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात सुवर्णा रावराणे, लीना अल्मेडा, अजित सावंत, संतोष सावंत, श्रीमती . आर. गावडे यांच्यासह एनएचएमचे कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.