|Monday, April 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » उपोषण… यांचे आणि त्यांचे

उपोषण… यांचे आणि त्यांचे 

कस्तुरबा हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होते. सविनय कायदेभंगाची कल्पना आपणाला त्यांच्याकडे पाहूनच सुचली असे महात्मा गांधींनी म्हटले होते. आपणाला जे हवे ते नम्रपणे आणि तितक्याच आग्रहीपणाने कस्तुरबा साध्य करून घेत. त्यांचा दृढनिश्चय म. गांधींना आश्चर्यचकित करे. सत्याग्रही कसा असावा, तर तो कस्तुरबांसारखा असे महात्माजींना त्यातून सांगावयाचे  होते. कस्तुरबा यांचा जन्म 11 एप्रिल 1869 चा. राजकीय सोय म्हणून का होईना सर्वच पक्षांच्या नेत्यांना  महात्मा गांधी यांचे सदैव स्मरण करावे लागते. त्या तुलनेत कस्तुरबांचे नावसुद्धा कुणी घेत  नाही. काळाचा महिमा असा असतो. अहिंसा, सत्याग्रह, सविनय कायदेभंग या तत्त्वांच्या आधाराने महात्मा गांधींनी ब्रिटिश साम्राज्य हादरवून टाकले. स्त्रियांचा स्वातंत्र्य लढय़ातला सहभाग महात्मा गांधी यांच्या प्रयत्नांनी वाढला. कस्तुरबा या त्यांच्या लढय़ातील आघाडीच्या शिलेदार होत्या. तसे पाहिले तर महात्मा गांधी आणि कस्तुरबा ही दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे होती. गांधीजी बॅरिस्टर, तर कस्तुरबा अशिक्षित. गांधीजींच्या साक्षरतेच्या प्रयोगांना त्यांनी दाद दिली नाही. देशाच्या आणि जगाच्यादृष्टीने  गांधीजी महात्मा असतील, कस्तुरबांच्यादृष्टीने ते पती, मुलांचे पिता होते. दक्षिण आफ्रिकेत आणि नंतर भारताच्या स्वातंत्र्य लढय़ात गांधीजींच्याबरोबरीने त्या राहिल्या. प्रसंगी तुरूंगवास पत्करला. महात्मा गांधीजींसारख्या व्यक्तीला समजून घेणे, त्यांच्या जीवनाशी एकरूप होणे आणि हे करताना स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्त्व जिवंत ठेवणे हे सोपे नव्हते. ते कस्तुरबाच करू शकल्या. स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात गांधींनी वेगवेगळ्या कारणांमुळे उपोषणे केली. त्यांचे उपोषण सुरू झाले की देशातील जनताच नव्हे तर ब्रिटिश सरकारही हवालदिल व्हायचे.  त्याचे कारण  त्यांच्याकडे असणारे नैतिक सामर्थ्य. गांधीजी प्रभावी वक्ते नव्हते. पण त्यांच्या शब्दाचे सामर्थ्य एखाद्या मंत्रासारखे होते. ‘चले जाव’ असे ते म्हणाले तेव्हा देशातील जनता निर्णायक लढय़ासाठी रस्त्यावर उतरली.  गांधीजींमध्ये काही दोष नव्हते असे नाही. पण त्यांचा विचार आणि कृती यामध्ये एक प्रकारचा सच्चेपणा होता. पं. नेहरू, सरदार पटेल यासारख्या नेत्यांनी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले, त्याचे कारण कदाचित हेच असावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्याला गांधीविचार पटला नाही. पण त्यांनी आंदोलने करताना सत्याग्रह, अहिंसा याच मार्गाचा अवलंब केला. गांधीजी स्वतःला हिंदु मानत. मात्र त्यांचा हिंदुत्वाचा विचार स्वा. सावरकर यांच्या विचारांपेक्षा वेगळा होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गांधीजींचा तिरस्कार केला,  पण गांधीजींचा देशव्यापी प्रभाव त्यांना कधीच नाकारता आला नाही. संघाच्या मुशीतून जन्मलेल्या भाजप सरकारचे पंतप्रधान असले तरी नरेंद्र मोदी याना देशा परदेशात गांधी नावाची जपमाळ ओढावी लागते यात बरेच काही आले. देशातील मुस्लिम धर्मियांविषयी गांधीजींच्या मनात व्यापक सहानुभूती होती. पण मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणाऱया मुस्लीम लीगला गांधी हे हिंदुंचे नेते वाटत होते. वस्तुतः गांधीजींचा धर्मविचार मंदिर, मशीद, चर्च याच्या पलीकडे जाणारा सर्वधर्मसमभावाचा होता. धार्मिक सहिष्णुता त्यांना महत्त्वाची वाटत होती. फाळणीनंतर देशभरात दंगलींचा आगडोंब उसळला, तेव्हा थकलेल्या वृद्ध कृश देहाच्या महात्म्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारला. महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यांच्या बलिदानाने हिंसाचार थांबला. त्यांच्या उपोषणाचे अस्त्र नंतरच्या काळात अनेक तथाकथित गांधीवादी नेत्यांनी वापरले. सर्व पक्ष, संघटनांचे नेत्यांनी प्रसंगी अन्यायाविरुद्ध उपोषणाचे हत्यार वापरले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी खुले करावे म्हणून साने गुरूजींनी उपोषण केले.  समाजसेवक अण्णा हजारे हे गांधीमार्गाने जाणारे अलीकडच्या काळातले ठळक नाव. म. गांधी किंवा साने गुरूजी यांच्यामागे जे नैतिक बळ होते त्याचा अभाव अण्णांच्या उपोषणामध्ये  दिसतो. भ्रष्टाचाराविरोधात, माहिती अधिकाराच्या कायद्यासाठी किंवा लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी उपोषणे केली, त्यातली काही यशस्वी झाली. बरीच फसली. मनमोहनसिंग सरकारच्या काळात दिल्लीत अण्णांनी उपोषण केले, त्या आंदोलनातून पुढे आलेले केजरीवाल आता दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत,तर किरण बेदी राज्यपाल झाल्या आहेत. त्याच अण्णानी अलीकडे दिल्लीत पुन्हा एकदा उपोषण नाटय़ाचा नवा प्रयोग केला. मात्र पहिल्या प्रयोगाइतका दुसरा प्रयोग रंगला नाही. अण्णा हजारे असोत की त्यापूर्वीचे स्वतःला गांधीवादी समजणारे नेते असोत, त्यांच्याकडून कळत नकळतपणे उपोषण अस्त्राचा पुरेशा गांभीर्याने वापर झाला नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते. उपोषणातले गांभीर्य निघून गेले की काय होते हे काँग्रेसच्या नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी दाखवून दिले. राजघाट हे म. गांधी यांचे समाधीस्थळ. त्याच ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी उपोषण केले. त्यापूर्वी भरपूर नाष्टा केल्याचे त्यांचे फोटो व्हायरल झाल्याने हे उपोषण नाटय़ म्हणजे फार्स ठरला. गांधीजींच्या काँग्रेसचे अधःपतन राहुल गांधीच्या युगात किती झाले आहे हेच यावरून दिसून यावे. हे कमी होते म्हणून की काय भाजपनेही काँग्रेसचाच कित्ता गिरवण्याचे ठरवलेले दिसते. संसदेत वाया गेलेल्या तासांचा आत्मक्लेश म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाचे सर्वच खासदार उपोषण करणार आहेत.  संसदेचे कामकाज वाया जाण्याची ही काही पहिलीच घटना नाही. विरोधी पक्ष म्हणून संसदेत काम करताना भाजपच्या गोंधळामुळे अनेक अधिवेशने वाया गेली तेव्हा  कधी हा उपोषण मार्ग सुचला नव्हता. भाजपने केले तेच इतर पक्ष करीत आहेत. खरे म्हणजे संसदीय कामकाजात सुधारणा हवी असेल तर जबाबदार लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. निम्मे लोकप्रतिनिधी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतील  तर चांगल्या कामकाजाची अपेक्षा कशी करणार? उपोषण करणाऱयांची पात्रता आणि हेतू शंकास्पद असतील  तर साध्य काहीच होणार नाही. गांधीजींच्या इतके नैतिकबळ आजच्या कुठल्याच राजकारणी नेत्यांकडे नाही हे वास्तवच त्यातून अधोरेखीत होते.

Related posts: