|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पर्यटनाच्या विकासासाठी चंदगडच्या पश्चिम भागात रस्त्यांची गरज

पर्यटनाच्या विकासासाठी चंदगडच्या पश्चिम भागात रस्त्यांची गरज 

विजयकुमार दळवी/ चंदगड

चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात काही नव्या रस्त्यांची बांधणी केल्यास आंबोली-पारगड-तिलारी परिसरातील वाहतुक वाढण्याबरोबरच पर्यटनाला वाव मिळून रोजगाराच्या नव्या संध्या उपलब्ध होऊ शकतील, अशी परिस्थिती आहे.

चंदगड तालुक्याचे प्रती महाबळेश्वर करण्याचे स्वप्न स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी पाहून त्या दृष्टीने त्यांनी सकारात्मक हालचाली चालवल्या होत्या. इसापूर ते चौकुळ हा त्यापैकीच महत्वाचा मार्ग होता. त्यांनी तो आपल्या कारकिर्दित पूर्ण केला. आता इसापूर ते चौकुळ मार्गे आंबोली अशा पर्यटकांच्या गाडय़ा फिरत आहेत. चंदगड तालुक्यातील जांबरे पासून ‘इसापूर-चौकुळ मार्ग’ केवळ पांच कि.मी. अंतरावर आहे. जांबरे ते इसापूर-चौकुळ मार्ग रस्ता झाल्यास चंदगडचा माणूस वीस कि. मी. च्या टप्यात आंबोली गाठू शकेल. चंदगडच्या प्रवाशाला सध्या इसापूर मार्गे वा आंबोलीमार्गे चौकुळला जावे लागते. त्यासाठी किमान चाळीस कि.मीं.चा प्रवास करावा लागतो. मात्र जांबरेपासून केवळ पाच कि.मी.चा रस्ता केल्यास चौकुळ निम्याने कमी होणार आहे. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या निसर्गरम्य वृक्षसंपदेने पर्यटकाला वेगळे समाधान मिळणार आहे. नागवे ते हेरे हा चार कि.मी. अंतराचा रस्ता झाल्यास हेरे आणि नागवे-श्रीपादवाडी भागातील दळण-वळण वाढण्यास मदत होणार आहे. उपेक्षित भाग विकासाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार आहे. सावताचीवाडी ते माळी हा तीन कि.मी. अंतराचा रस्ता झाल्यास या भागातील लोकांना खरे स्वातंत्र्य अनुभवता येणार आहे. सध्या माळी ते खळणेकरवाडी हा रस्ता आहे. मात्र खळणेकरवाडी ते नागवे, कोळींद्रे रस्त्याला जोडणारा पक्का रस्ता झाल्यास या भागाच्या प्रगतीला वेग येणार आहे. नागवे-श्रीपादवाडी, कोळींद्रे गावचे लोक गेल्या कैक वर्षापासून रस्त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. रस्त्यासाठी धरणे आंदोलन, मोर्चा आदी लोकशाही प्रणित मार्गांचाही त्यांनी अवलंब केला. पण शासनाला जाग येत नाही. रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. एकीकडे त्याच त्या रस्त्यावर वर्षानुवर्षे डांबर ओतून कोटय़ावधी रूपयांचा ढपला मारला जातो. आणि दुसरीकडे स्वातंत्र्याला 70 वर्षे होऊनही दोन-तीन, दोन-तीन किमीच्या रस्त्यांसाठी संघर्ष करावा लागतो. चंदगड तालुका पर्यटनाच्या माध्यमातून भविष्यात क्रांती करू शकेल, अशी परिस्थिती आहे. त्यासाठी सुबक रस्त्यांची बांधणी युध्दपातळीवर होण्याची गरज आहे. चंदगडच्या आमदारांनी या रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करून स्व. बाबासाहेब कुपेकरांचे अधुरे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी लोकांतून होत आहे.