|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » केटी इरफान, राकेश बाबू यांची राष्ट्रकुलमधून हकालपट्टी

केटी इरफान, राकेश बाबू यांची राष्ट्रकुलमधून हकालपट्टी 

रूममध्ये सीरिंज सापडल्याने सीजीएफचा निर्णय, भारत अपील करणार

वृत्तसंस्था/ गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारतीय स्पर्धकांनी पदकांची बरसात सुरू  केली असताना त्याला गालबोट लागणारी एक घटनाही घडली आहे. रेस वॉकर केटी इरफान व तिहेरी उडीपटू व्ही. राकेश बाबू यांना ‘नो नीडल’ धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल स्पर्धा आयोजन समितीने मायदेशी पाठविले आहे. या संदर्भात भारतीय पदाधिकाऱयांनाही कडक समज देण्यात आली आहे. या निर्णयाविरुद्ध भारत अपील करणार असल्याचे सांगण्यात आले.

‘राकेश बाबू व इरफान कोलोथम थोडी यांच्यावर स्पर्धेतील सहभागावर तत्काळ बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून त्यांचे परवानापत्र रद्द करण्यात आले असून दोघांनाही राष्ट्रकुलच्या क्रीडाग्रामातून बाहेर घालविण्यात आले आहे,’ असे राष्ट्रकुल क्रीडा फेडरेशनचे (सीजीएफ) अध्यक्ष लुईस मार्टिन यांनी फटकारले आहे. ऑस्ट्रेलिया सोडून जाण्यासाठी उपलब्ध असणाऱया पहिल्या विमानाने त्यांना हाकलून देण्याची व्यवस्थान भारतीय संघटनेला करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे. इरफानने भाग घेतलेली 20 किमी चालण्याची शर्यत पूर्ण झाली असून त्यात त्याने 13 वा क्रमांक मिळविला. 28 वषीय राकेश बाबू मात्र शुक्रवारी तिहेरी उडीच्या अंतिम फेरीत भाग घेणार होता. पात्रता फेरीत त्याने 12 वे स्थान मिळविले होते. मात्र हे दोघेही डोपिंगमध्ये सापडले नसल्याचे सीजीएफने स्पष्ट केले आहे.

या स्पर्धेच्या सुरुवातीवेळीही एका भारतीय बॉक्सरच्या खोलीजवळ इंजेक्शनची सुई आढळून आली होती. त्यावेळी भारतीय स्पर्धकावरच संशय व्यक्त केला गेला होता. पण सीरिंजची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात चूक केल्याबद्दल त्यावेळी सीजीएफने फक्त ताकीद देऊन विषय संपविला होता. या स्पर्धेत सीरिंजचा वापर करण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली असून केवळ उपचारासाठी त्याची गरज लागल्यास डॉक्टरांचे तसे प्रमाणपत्र सादर करावे लागते. सुनावणीवेळी दोघांनीही आपल्या बॅगमध्ये सीरिंज कशा आल्या, त्याचे स्पष्टीकरण दिले. पण त्यावर सीजीएफ समाधानी नसल्याचे दिसून आल्यानंतर पथकप्रमुख विक्रम सिसोदिया, नामदेव शिरगावकर, रवींदर चौधरी यांनी कडक शब्दांत ताकीद देण्यात आली.

सीजीएफ निर्णयाविरुद्ध भारत अपील करणार

सीजीएफ कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करणार असल्याचे भारतीय पथकाने म्हटले आहे. ‘काही निर्णय आम्हाला मान्य नाहीत. त्यासंदर्भात आम्ही वरि÷ अधिकाऱयांशी चर्चा करून त्याविरुद्ध अपील करणार आहोत, असे पथकाचे सरव्यवस्थापक शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.