|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » युवावर्गाने शिक्षणाची कास धरावी!

युवावर्गाने शिक्षणाची कास धरावी! 

सुरेश प्रभू यांचे आवाहन : विशेष घटक योजनेवरील दिनदर्शिकेचे प्रकाशन

प्रतिनिधी / ओरोस:

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ देशापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आज जगभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली जात आहे. डॉ. आंबेडकर यांना अपेक्षित असणारी समानता प्रस्थापित होण्यासाठी युवक-युवतींनी शिक्षणाची कास धरण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य, उद्योग तथा नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे केले.

येथील सामाजिक न्याय भवनात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती तसेच सामाजिक सप्ताह समारोप कार्यक्रमात प्रभू प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री दीपक केसरकर होते. व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, जि. प. सदस्या अनुप्रिती खोचरे, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर, अतुल काळसेकर, नागोराव पांचाळ, अतुल बंगे, नंदन वेंगुर्लेकर, संदीप कदम, आनंद मेस्त्राr, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर उपस्थित होते.

शिका व संघटित होऊन आपल्या न्याय हक्कांसाठी लढा द्या, हा संदेश बाबासाहेबांनी समाजाला दिला. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी विकास योजना राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शक तत्वांचीच अंमलबजावणी करीत आहेत. मुंबईतील इंदू मिल स्मारकाचे काम अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण व्हावे, यासाठी प्रधानमंत्री प्रयत्नशील आहेत. लवकरच इंदू मिल येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास जाईल, असेही प्रभू म्हणाले.

जिल्हा माहिती कार्यालयाने विशेष घटक योजनेवर आधरित काढलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते यावेळी करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने शासनाचे मुखपत्र असलेल्या मासिक लोकराज्यचा एप्रिल 2018 चा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विशेषांक प्रकाशित झाल्याचे सांगितले. 50 रुपये किमतीत उपलब्ध असलेल्या या विशेषांकाची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच दिनदर्शिकेची माहिती देऊन लोकराज्य या मासिकाचे वर्गणीदार होण्याबाबत आवाहन यावेळी त्यांनी केले.

सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱया भाऊ कांबळे तसेच प्रश्नमंजुषा कार्यक्रमातील विजेत्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रारंभी मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून आदरांजली वाहिली. केंद्र शासनाच्या कॉमन सर्व्हास सेंटरच्यावतीने सुयोग दीक्षित यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची बायोग्राफी मान्यवरांना भेट दिली. या समारोप समारंभास मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related posts: