|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव

मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव 

वृत्तसंस्था / मुंबई

अकराव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सला शनिवारी सलग तिसऱया पराभवाला सामोरे जावे लागले. सामनावीर जेसन रॉयने झळकवलेल्या नाबाद 91 धावांच्या बळावर दिल्ली डेअरडेविल्सने मुंबई इंडियन्सवर 7 गडय़ांनी विजय मिळविला.

शनिवारच्या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 7 बाद 194 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली डेअरडेविल्सने 20 षटकांत 3 बाद 195 धावा जमवित या स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदविला. हा सामना सुरू होण्यापूर्वी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही संघांनी आपले पहिले दोन्ही सामने गमविले होते.

मुंबईच्या डावामध्ये सलामीच्या सुर्यकुमार यादवने 32 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 53 तर लेविसने 28 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 48, इशान किसनने 23 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 44, रोहित शर्माने 15 चेंडूत 2 चौकारांसह 18, हार्दिक पांडय़ाने 1 चौकारांसह 11 धावा जमविल्या. यादव आणि लेविस या सलामीच्या जोडीने 9 षटकांत 102 धावांची शतकी भागिदारी केली. किसन आणि शर्मा यांनी तिसऱया गडय़ासाठी 57 धावांची भर घातली. मुंबईतर्फे 7 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. दिल्लीतर्फे बोल्ट, ख्रिस्टेन, तेवातिया यांनी प्रत्येकी 2 तर शमीने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्लीने 3 बाद 195 धावा जमविल्या. सलामीच्या जेसन रॉयने 53 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 91 धावांची खेळी केली. गंभीरने 2 चौकारासह 15, ऋषभ पंतने 25 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 47, मॅक्सवेलने 6 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारांसह 13 तर अय्यरने 20 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 27 धावा जमविल्या. रॉय आणि अय्यर या जोडीने चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 60 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीच्या डावात 10 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. मुंबईतर्फे हार्दिक पंडय़ाने 21 धावात 2 तर रेहमानने 25 धावांत 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स 20 षटकांत 7 बाद 194 (सुर्यकुमार यादव 53, लेविस 48, इशान किशन 44, रोहित शर्मा 18, पंडय़ा 11, बोल्ट, ख्ा्रिस्टेन, तेवातिया प्रत्येकी 2 बळी). दिल्ली डेअरडेविल्स 20 षटकांत 3 बाद 195 (जेसन रॉय नाबाद 91, अय्यर नाबाद 27, गंभीर 15, पंत 47, मॅक्सवेल 13, हार्दिक पंडय़ा 2/21, रेहमान 1/25.