|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ओजस आंतरराष्ट्रीय शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य!

ओजस आंतरराष्ट्रीय शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य! 

पालकमंत्री दीपक केसरकर यांची चराठे ग्रामस्थांना ग्वाही

वार्ताहर / ओटवणे:

संपूर्ण कोकणातून चराठा प्राथमिक शाळेची ओजस आंतरराष्ट्रीय शाळेसाठी झालेली निवड सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी अभिमानास्पद असून या नियोजित आंतरराष्ट्रीय शाळेसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेसाठी लागणाऱया जमीन संपादनाचा प्रश्न येत्या आठ दिवसात सोडविण्याच्या सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार सतीश कदम यांना दिल्या.

गेल्या महिन्यात चराठा प्राथमिक शाळेला ओजस आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून नामांकन प्राप्त झाले. या शाळेच्या पुढील नियोजन व सुविधांबाबत चराठावासीयांनी शनिवारी सकाळी दीपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी चराठा सरपंच बाळू वाळके, उपसरपंच जॉनी फेरांव, माजी सरपंच ऍड. मंगेश धुरी, माजी उपसरपंच मोहन परब, देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळू परब, मुख्याध्यापिका वर्षा देसाई, चित्रा धुरी, तन्वी परब, देवस्थान कमिटी सचिव राघो परब, प्रकाश बिर्जे, सहदेव कासार, पुरुषोत्तम परब, अमर चराठकर, केंद्रप्रमुख प्रमोद पावसकर, रामचंद्र कुबल, संदीप मेस्त्राr, बापूशेट कोरगावकर उपस्थित होते.

मुख्याध्यापिका वर्षा देसाई यांनी ओजस आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाल्याच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. तसेच या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेसाठी भौतिक सुविधा देण्याची मागणी पालकमंत्री केसरकर यांच्याकडे केली. सरपंच बाळू वाळके यांनी या शाळेची नियोजित इमारत व इतर सुविधांपासून प्रशासनाच्यावतीने  त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली. बाळू परब यांनी या शाळेच्या नियोजित इमारती देवस्थान जमिनीत येत असून देवस्थान कमिटीकडून या जमिनी त्वरित संपादित करण्याची मागणी पालकमंत्री केसरकर यांच्याकडे केली. जॉनी फेरांव, मंगेश धुरी यांनीही या नियोजित शाळेबाबत मनोगत व्यक्त मांडले.

पालकमंत्री केसरकर यांनी चराठा शाळेची ओजस आंतरराष्ट्रीय शाळेसाठी निवड झाल्याबद्दल चराठावासीयांचे अभिनंदन केले. त्यानंतर या शाळेसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासह नियोजित सर्व इमारतींचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी जमीन संपादन व इतर प्रश्न त्वरित सोडविण्याच्या सूचना प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार सतीश कदम यांना दिल्या. त्यानंतर पालकमंत्री केसरकर यांनी चराठा ग्रामस्थांशी या शाळेबाबत चर्चा करून सहकार्याची ग्वाही दिली.

Related posts: