|Friday, January 18, 2019
You are here: Home » क्रिडा » राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांचा भव्य समारोप

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांचा भव्य समारोप 

संचलनात भारताचे नेतृत्व केले मेरी कोमने, भारताची कामगिरी उठावदार 

गोल्ड कोस्ट / वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आयोजित 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा समारोप शानदार पद्धतीने करण्यात आला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी इतिहास आणि संस्कृतीचे भव्य दर्शन घडविण्यात आले होते, तर समारोप कार्यक्रम आधुनिकतेने गाजला. पुढील स्पर्धा 2022 मध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे होणार आहे.

येथील कॅरारा मैदानात झालेल्या या दिमाखदार समारंभाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती लाभली. त्यांनी विविध देशांमधून स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या खेळाडूंना घोषणा आणि आनंदाच्या चित्कारांनी निरोप दिला. गेले 11 दिवस चाललेल्या या स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी उठावदार कामगिरी बजावली असून 26 सुवर्णपदकांसह एकंदर 66 पदकांची कमाई केली. यजमान ऑस्ट्रेलियाने 80 सुवर्ण पदकांसह 198 पदके मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला.

समारोप समारंभातील संचलनात भारतीय स्पर्धकांचे नेतृत्व बॉक्सिंगमधील सुवर्णपदक विजेत्या मेरी कोमने केले. भारताच्या समाधानकारक कामगिरीमुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. 2014 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 15 सुवर्णपदकांसह 65 पदके कमावली होती. यावेळी एकंदर पदकांच्या संख्येत केवळ एकची भर पडली असली तरी सुवर्णपदकांच्या संख्येत 11 ची भर पडली असून भारताच्या क्रमांकात 5 वरून 3 अशी सुधारणा झाली आहे.

खेळाडूंचे कौशल्य अजोड

या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वच खेळाडूंनी आपल्या अप्रतिम आणि अजोड क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन घडविले आहे. जागतिक विक्रमपटू आणि असामान्य प्रतिभेच्या खेळाडूंनी या स्पर्धेला वेगळय़ाच उंचीवर नेऊन ठेवले आहे. आज या स्पर्धांची समाप्ती होत असली तरी राष्ट्रकुल स्पर्धांचे भवितव्य अधिकाधिक उज्ज्वल होत आहे. आज राष्ट्रकुल आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा यांचे महत्व कधी नव्हे इतके वाढले आहे, अशा कौतुकभऱया शब्दात या राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या अध्यक्षा लुईस मार्टिन यांनी स्पर्धेचा समारोप झाल्याचे घोषित केले.

कलाकारांचा सहभाग

ऑस्ट्रेलियाचे अनेक नामवंत गायक आणि नर्तक यांचा सहभाग होता. त्यांनी आपल्या कलेचे मनोज्ञ प्रदर्शन घडवित समारंभाची शोभा शतगुणित केली. सर्व सहभागी देशांच्या खेळाडूंनी आपल्या देशाचे ध्वज फडकावित दिमाखदार संचलन केले. त्यामुळे उपस्थितांच्या डोळय़ांचे पारणे फिटले.

स्वयंसेवकांचाही गौरव

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 15 हजारांहून अधिक स्वयंसेवकांचे सहा महिन्यांचे परिश्रम कारणीभूत ठरले आहेत. या स्वयंसेवकांचाही यथोचित गौरव या समारंभात करण्यात आला. या स्वयंसेवकांनाही कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती.

अंतिम निरोप ‘मूळ समाजा’कडून

समारोप समारंभात आधुनिकतेवर भर दिला गेला असला तरी ऑस्ट्रेलियाच्या मूलवासियांना विसरण्यात आले नव्हते. सहभागी खेळाडूंसाठीचा अंतिम निरोप समारंभ ‘युगांबे’ नामक मूलजमातीच्या नागरिकांकडून करण्यात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या इतिहासाचाही स्पर्श या कार्यक्रमाला झाला.

युसेन बोल्टची सुखद उपस्थिती

विश्वविक्रमी धावपटू युसेन बोल्ट याची उपस्थिती हा सर्वांसाठी सुखदाश्चर्याचा धक्काच होता. त्याने अगदी अंतिम क्षणी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर येऊन उपस्थितांना अभिवादन केले. आयोजकांच्या या कल्पकतेवर अनेकांनी नंतर कौतुकाच्या प्रतिक्रिया दिल्या.

 

निदर्शनांना खंड नाही

मैदानात समारोपाचा भव्य कार्यक्रम सुरू असताना बाहेर मात्र मूलवासियांच्या विविध संघटनांनी निदर्शने केली. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात भरविण्यास त्यांचा प्रथमपासूनच विरोध होता. उद्घाटन कार्यक्रमातही त्यांनी आपला निषेध दाखवून दिलेला होता. ही प्रक्रिया समारोपाच्या कार्यक्रम पार पडेपर्यंत सुरू होती.

Related posts: