|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शेट्टी, आठवले सत्तेचे कावळे : खा.कीर्तिकर

शेट्टी, आठवले सत्तेचे कावळे : खा.कीर्तिकर 

प्रतिनिधी / सांगली

  खा. राजू शेट्टी आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सत्तेचे कावळे आहेत. ज्यांच्याकडे सत्ता तिकडे ते जात असतात. दोघांनाही आम्ही युतीमध्ये घेतले. पण सत्तेसाठी त्यांनी भाजपाबरोबर जवळीक केली. आता तर खा. शेट्टींचा काँग्रेस हाच भगवान बनला असल्याची जोरदार टीका करत शिवसेना गतवेळी खा. शेट्टीसाठी सोडलेली हातकणंगले लोकसभा लढवणार असल्याचा इशारा शिवसेना नेते खा. गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केला.

 याशिवाय सांगली आणि सातारा लोकसभेसाठीही सेनेने तयारी सुरू केली आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिह्यात शिवसेनेचे सध्या 8 आमदार असून ती संख्या 16 पर्यंत वाढवणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे पैशाचा पाऊस पाडणारे मंत्री आहेत. आतापर्यंत हा पाऊस पाडूनच त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीत जनाधार असणारे मोठे नेते खरेदी केले आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पण शिवसेनेला त्याची गरज नाही. मोदींचा प्रभाव ओसरू लागल्याने चंद्रकांत पाटील यांनी खरेदी केलेले नेते परतीच्या वाटेवर लागले आहेत. राज्यात शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढवून जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

 सांगली महापालिका निवडणूक तसेच लोकसभेच्या 2019 मध्ये होणाऱया निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. त्या निमित्ताने रविवारी सांगली दौऱयावर असलेल्या खा. कीर्तिकर यांनी शिवसेना मेळाव्या आधी शासकीय विश्रामधाम येथे पत्रकारांशी संवाद साधला.  यावेळी बोलताना खा.किर्तीकर म्हणाले, गत लोकसभा निवडणुकीवेळी खा. राजू शेट्टी हे शिवसेनेचे सहयोगी होते. शिवसेनेने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा खा. शेट्टी यांच्यासाठी सोडली होती. तर सांगलीची जागा भाजपासाठी आणि सातायाची जागा रिपाइंसाठी सोडली होती. मात्र, यावेळी सांगली, हातकणंगले आणि सातारा या लोकसभेच्या तिन्ही जागा शिवसेना लढवणार आहे.

 खा. कीर्तिकर म्हणाले, ज्या मोदी लाटेवर भाजपाने देशात सत्ता मिळवली, त्या मोदी लाटेची घसरण सुरु झाली आहे. भाजपाने इतर पक्षातील जनाधार असलेले नेते पैसे देवून विकत घेतलेले आहेत. चंद्रकांत पाटील तर पैशाचा पाऊस पाडत आहेत. पण, भाजपची ताकद ही तात्पुरती असून ती फार काळ टिकणार नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 ते म्हणाले, भाजपाने इतर पक्षातील नेते विकत घेऊन आपली ताकद वाढवली. मात्र, त्यांची ही ताकद कायमस्वरुपाची नसून ती तात्पुरती आहे. सत्ता असलेल्या भाजपने उपोषण करणे हा भंपकपणा आहे. अनेकदा अनेक पक्ष अशी टोकाची भूमिका घेतात. चंद्राबाबू नायडूंच्या खासदारांनाही अशीच भूमिका घेतली. पण अशावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडगा काढला नाही. त्यावर उपोषण हा भंपकपणा असल्याची टीका करत शिवसेनेला असल्या गोष्टींची कधीच गरज भासली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, हल्लाबोलसारखी जाहिरात शिवसेनेला करावी लागत नाही. शिवसेनेचा संघटनात्मक बांधणीवर भर असतो. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याची ताकद दिसेल. शिवसेनेने या तिन्ही शहरांमध्ये कार्यकर्ते, पदाधिकाऱयांची मोट बांधली आहे. बुथ यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेनेची ताकद येथे वाढली आहे. शिवसेनेने जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये चांगले यश मिळवले असून आगामी महापालिका निवडणूक शिवसेना लढवणार असून ती जिंकणार असल्याचा विश्वासही खासदार कीर्तिकर यांनी व्यक्त केला. त्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

महापालिका सहज चालवू

गेल्या 20 वर्षांपासून सतत 38 हजार कोटी रुपयांचे बजेट असलेली मुंबई महानगरपालिका शिवसेना यशस्वीरित्या चालवत आहे. मुंबईत वीज, रस्ते, आरोग्य, दिवाबत्ती, कचरा, पाणी आदी सर्व प्रश्न शिवसेनेने सोडवले आहेत. त्यामुळे 700 ते 800 कोटी रुपये बजेट असलेली सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शिवसेना सहज चालवू शकते, असा विश्वास खासदार कीर्तिकर यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, शेखर माने, दिगंबर जाधव, जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते.

Related posts: