|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शून्यदृष्टीच्या सुनिता वासकरची ‘डोळस’ भरारी !

शून्यदृष्टीच्या सुनिता वासकरची ‘डोळस’ भरारी ! 

राजू चव्हाण/ खेड

लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत मंडणगड तालुक्यातील घराडी येथील स्नेहज्योती अंध विद्यालयात शिक्षण घेणाऱया शून्यदृष्टीच्या सुनिता वासकर हिने घेतलेली ‘डोळस’भरारी थक्क करणारी आहे. वाडिया महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयाची पदवी घेत बँकींग परीक्षेत यश मिळवणाऱया सुनिताची कॅनरा बँकेत प्रशासकीय सहाय्यक व्यवस्थापिका म्हणून निवड झाली आहे.

  मंडणगड तालुक्यातील तिडे-सुतारवाडी येथील रहिवासी असलेल्या सुनिताची घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. संघर्षमय जीवन जगणाऱया सुतार कुटुंबियाला स्नेहज्योती अंध विद्यालयाने खराखुरा आधार देत तिच्या शिक्षणाची स्वतःच्या शिरावर घेतली. अंधांना लिहिता-वाचता येते हाच मुळात तिच्या आकलनापलिकडचा विषय होता. याचमुळे तिची आई आढेवेढे घेत होती. अखेर स्नेहज्योतीच्या पदाधिकाऱयांनी तिला विश्वासाचा शब्द देत बेललिपीतून शिकवण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार स्नेहज्योती अंध विद्यालयात तिला दाखल करून घेत तिचे शिक्षण संस्थेने निःशुल्क दिले. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर 9 वी नंतर सुनिताने संस्थेकडे उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त केली. मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता यांनी आळंदी येथील जागृती अंध विद्यालयात तिच्या शिक्षणाची व्यवस्था करत तिचा पुढील प्रवास मार्गी लावला.  12 वीच्या परीक्षेत पुणे विद्यापीठातून अंध विभागात 86 टक्के गुण मिळवत तिने अव्वल स्थान प्राप्त करत हा विश्वास सार्थ ठरवला.

त्यानंतर निवांत अंध विद्यालयाच्या मीरा बडवे यांनी वैयक्तिक मार्गदर्शन करत त्यांच्याच वसतिगृहात तिला प्रवेश मिळवून दिला. यशस्नेहा ट्रस्टने तिच्या संपूर्ण शिक्षणाचा आर्थिक भार पेलला. वाडिया महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातून बी. ए. पदवी घेत सुनिताने बँकिंग परीक्षा दिली. या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केल्याने तिची कॅनरा बँकेत प्रशासकीय सहाय्यक व्यवस्थापिकापदी निवड झाली आहे. स्नेहज्योती अंध विद्यालयात 23 एप्रिल रोजी तिच्या खास सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी अभिनेते विद्याधर जोशी, खेड, दापोलीचे प्रांताधिकारी व तहसीलदार उपस्थित राहणार असल्याचे संस्था कार्यवाह उत्तमकुमार जैन यांनी सांगितले.

 

Related posts: