|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खंडित वीजपुरवठय़ामुळे केपेत लोकभावनेचा उद्रेक

खंडित वीजपुरवठय़ामुळे केपेत लोकभावनेचा उद्रेक 

वार्ताहर/ केपे

शेल्डे येथील वीज उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळून गेल्याने केपे पालिका क्षेत्रात तसेच जवळपासच्या भागांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत 24 तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिला. यामुळे संतापलेल्या लोकांनी केपे वीज कार्यालय गाठून तिथे असलेल्या जुन्या ट्रान्सफॉर्मरला आग लावण्याची घटना शनिवारी रात्री घडली.

त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रविवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रविवारी केपेचा बाजार बंद करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यानंतर रविवारी सकाळी 8 वा. वीजपुरवठा सुरळीत झाला.

शुक्रवार रात्रीपासून वीज पुरवठा खंडित

शुक्रवारी रात्री केपे पालिका क्षेत्राबरोबर आंबावली, अवेडे-कोठंबी, शेल्डे भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी लोकांनी वीज कार्यालयाशी संपर्क साधला असता शेल्डे उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आधीच उकाडय़ाने हैराण झालेल्या लोकांनी कशीबशी शुक्रवारची रात्र घालविली. मात्र शनिवारी दिवसभर देखील वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने लोकांच्या रागाचा पारा वाढला. त्यातच लोकांनी वीज खात्याचे कनिष्ठ अभियंता, साहाय्यक अभियंता, मामलेदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणीही फोन कॉल न घेतल्याने नाराजीत भर पडली.

जुन्या ट्रान्सफॉर्मरला आग लावली

शेवटी संतप्त लोकांनी शनिवारी रात्री जाब विचारण्यासाठी केपे वीज कार्यालय गाठले. या प्रकाराने तेथील कर्मचारी गोंधळून गेले. त्यानंतर लोकांनी तेथे असलेल्या जुन्या ट्रान्सफॉर्मरला आग लावली. या घटनेनंतर पोलीस तिथे दाखल झाले व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांनाही जाग आली. यावेळी आग विझविण्यासाठी कुडचडे अग्निशामक दल दाखल झाले असता त्यांना लोकांनी आग विझवू दिली नाही. त्यामुळे शेवटी पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी रोहित कदम यांना दाखल होऊन लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करावा लागला.

अभियंत्यांचा लागेना ठावठिकाणा

एवढा सारा प्रकार झाला तरी वीज अधिकाऱयांचा पत्ता नव्हता. नाराज झालेल्या लोकांनी याप्रसंगी साहाय्यक अभियंत्यांना बोलावून घेण्याचा आग्रह धरला. साहाय्यक अभियंत्यांचा ठावठिकाणा नाही आणि कनिष्ठ अभियंत्यांचाही पत्ता नाही, याकडे लक्ष वेधून त्यांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. रविवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर केपेचा बाजार बंद करण्यात येईल, असा इशारा नंतर लोकांनी दिला.

शेवटी रविवारी सकाळी 8 वा. वीजपुरवठा सुरू झाला. शेल्डे केंद्रातून येणारी वीज केपेतूनच कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीला पुरविली जाते. जवळजवळ दोन दिवस केपे परिसरात वीजपुरवठा खंडित असताना कुंकळ्ळी वसाहतीत मात्र कशी काय वीज देण्यात आली, असा सवाल नाराज लोकांनी उठविला आहे. सरकारला जनतेचे काहीच पडून गेलेले नाही काय, असाही प्रश्न लोकांकडून करण्यात येऊ लागला आहे.

नवा ट्रान्सफॉर्मर दाखल

लोकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यानंतर वीज खात्याकडून ताबडतोब रविवारी बेंगलुरू येथून नवा ट्रान्सफॉर्मर आणण्यात आला. दरम्यान, रविवारी रात्री 8 च्या सुमारास केपे बाजार क्षेत्र वगळता इतर काही भागांतील वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला होता.