|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘मालवणी वळेसार’मध्ये बोलीची ठळक वैशिष्टय़े!

‘मालवणी वळेसार’मध्ये बोलीची ठळक वैशिष्टय़े! 

मधु मंगेश कर्णिक यांचे प्रतिपादन : प्रा. वैभव साटम यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

प्रतिनिधी / कणकवली:

वैभव साटम यांच्यासारखा तरुण लेखक मालवणी बोलीच्या संशोधनासाठी धडपडतो ही चांगली घटना आहे. अशाच प्रयत्नातून आपली बोली टिकत असते. त्यांनी ‘मालवणी वळेसार’ या आपल्या ग्रंथातून मालवणी बोली आणि तिची ठळक वैशिष्टय़े प्रभावीपणे मांडली आहेत. बोली टिकविण्याचा असा प्रयत्न सातत्याने होत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार मधु मंगेश कर्णिक यांनी प्रा. साटम यांच्या ‘मालवणी वळेसार’ या पुस्तकाच्या ठाणे येथील अनघा पुस्तक महोत्सवात आयोजित प्रकाशन समारंभप्रसंगी केले.

अनघा प्रकाशनतर्फे प्रा. साटम यांच्या ‘मालवणी वळेसार’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला असून या ग्रंथाचे प्रकाशन कर्णिक यांच्या हस्ते झाले. यावेळी कर्णिक यांनी कोकणातील मालवणी ही मुख्य बोली असून तिच्या जतनासाठी मालवणी बोलीतून विपूल प्रमाणात साहित्याची निर्मिती होत राहिली पाहिजे, असेही कथन केले. ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार भरतकुमार राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला मालवणी कवी महेश केळुसकर आदी उपस्थित होते.

कर्णिक म्हणाले, कोकणात जवळपास बारा बोली मुख्यपणे बोलल्या जातात. त्यापैकी मालवणी (कुडाळी), संगमेश्वरी, बाणकोटी, आगरी, दादली या बोलींचा समावेश होतो. या प्रत्येक बोलीचं एक वैशिष्टय़ आहे. त्यामुळे ती बोली त्या ठिकाणची संस्कृती ठरते. वैभव साटम यांनी ‘मालवणी वळेसार’ या पुस्तकातून मालवणी बोली आणि तिची ठळक वैशिष्टय़े प्रभावीपणे मांडली आहेत.

 राऊत म्हणाले, बोलीभाषेचे सौंदर्य त्या मातीत खुलून दिसते. तिला उगीच प्रमाणभाषेत मिसळून तिचा मूळ लहेजा बदलणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. केळुस्कर यांनी बोलीभाषेचे महत्व विशद केले.

 मालवणी बोली साहित्यांचा गौरव!

मालवणी आद्य कवी वि. कृ. नेरुरकर, वसंत सावंत, ना. शि. परब, महेश केळुस्कर, प्रवीण बांदेकर, अजय कांडर, नामदेव गवळी, रुजारिओ पिंटो, अविनाश बापट, सुनंदा कांबळे, सई लळीत, दादा मडकईकर आदींच्या मालवणी बोलीतील कवितांचा यावर्षीपासून मुंबई विद्यापीठाच्या अभासक्रमात समावेश करण्यात आला. ही मालवणी बोली भाषेच्या दृष्टीने गौरवाचीच घटना असून त्यातूनच आपल्याला ‘मालवणी वळेसार’ हे पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली. या पुस्तकात या कवींच्या कवितांचा परामर्श घेण्यात आला आहेच तसेच मालवणी भूभाग, बोलीभाषा व्यवहारात कमी होण्याची कारणमीमांसा, मालवणी बोली-व्याकरण, मालवणी बोली-उच्चार प्रक्रिया, मालवणी बोलीतील म्हणी व वाप्रचार, मालवणी बोली साहित्याचा इतिहास, मालवणी बोलीतील कविता-आशय व सौंदर्य, मालवणी प्रदेशातील लोकजीवन, मालवणी प्रदेशातील संस्कृती, दशावतार व भजने आदींची स्वतंत्र मांडणी करण्यात आली असल्याचे प्रा. साटम यांनी सांगितले.