|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » यंदा देशाचा 7.3 टक्के विकासदर

यंदा देशाचा 7.3 टक्के विकासदर 

जागतिक बँकेचा अनुमान : प्रतिवर्षी 81 लाख रोजगारनिर्मिती आवश्यक

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

2018-19 या आर्थिक वर्षात देशाचा 7.3 टक्क्यांनी विकास होईल असे जागतिक बँकेकडून अहवालात अनुमान वर्तविण्यात आला. 2019 आणि 2020 या वर्षांसाठी 7.5 टक्क्यांनी विकास होईल असे सांगण्यात आला. नोटाबंदी आणि जीएसटी यांच्या परिणामातून भारतीय अर्थव्यवस्था बाहेर पडल्याचे मत वर्तविण्यात आले.

2017 मध्ये देशाचा विकास दर 6.3 टक्के होता. चालू आर्थिक वर्षात विदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ दिसून येईल, याव्यतिरिक्त नागरिकांकडून खर्च अधिक प्रमाणात करण्यात आल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल असे जागतिक बँकेने आपल्या सहामाही अहवालात म्हटले. आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा तेजी परतत असल्याने भारतात गुंतवणूक वाढीला आणि निर्यातीला प्रोत्साहन मिळेल.

मागील काही वर्षांत विकास दर वाढल्याने गरिबी हटविण्यास मदत झाली. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱयांकडून खर्च अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. सातवा वेतन आयोग लागू आणि सरासरी मान्सून, कृषी क्षेत्रामुळे ग्रामीण भागातून मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. कृषीवगळता 2016 मध्ये विकास दर मागील वर्षाच्या 9.4 टक्क्यांवरून 2016 मध्ये 6.9 टक्क्यांवर पोसहोचला होता.

रोजगारनिर्मिती आव्हान

या अहवालात रोजगारनिर्मिती करण्यास सांगण्यात आले. देशात प्रत्येक महिन्यात रोजगारासाठी 12 लाख युवक बाहेर पडत असून प्रतिवर्षाला 81 लाख नवीन रोजगारनिर्मिती करणे हे गरजेचे आहे. यामुळे देशातील रोजगार दर स्थिर राहण्यास मदत होईल. मात्र 2005 ते 2015 दरम्यान रोजदार डेटामध्ये घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. भारतीय महिला रोजगार मोठय़ा प्रमाणात सोडत असल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे, असे जागतिक बँकेने म्हटले. नोटाबंदी आणि जीएसटीने देशाच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच दणका दिला होता. मात्र त्यातून अर्थव्यवस्था आता सावरत आहे. यामुळे विदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत झाल्याने आर्थिक विकास 7.4 टक्क्यांवर पोहोचेल.