|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपातील अंतर्गत कलह चव्हाटय़ावर

भाजपातील अंतर्गत कलह चव्हाटय़ावर 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिकेत मंगळवारी दुपारी भाजपाच्या नगरसेवकांची बैठक झाली. त्यामध्ये एकमेकांवर आरोप करत अगदी धराधरी करण्यापर्यंत मजल गेली. परंतु इनमीन सहा नगरसेवक भाजपाचे. त्यातही अंतर्गत कलह अचानकच उफाळून आला. पण या कलहाचा गवगवा केला कोणी? त्याचीच चर्चा सुरु असून तीन नगरसेवक तक्रारीचा पाढा वाचण्यासाठी थेट मुंबईला गेले तर तीन नगरसेवकांनी जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी बोलवल्याने कराडला गेले. त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांमधील वादावर वरीष्ठ मंडळी काय उपाय योजना करणार याकडेच लक्ष लागून राहिले आहे.

2016 मध्ये विशेष रस्ते अनुदान सातारा पालिकेसाठी मंजूर झाले. त्या अनुदानातून सुचवण्यात आलेल्या कामांना अगोदरच सत्ताधाऱयांकडून डावलेले जात होते. त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांसमोर डोकेदुखी ठरत होते. त्याच अनुदानाचे करायचे काय?, यावर मंगळवारी पालिकेत निवडणूक विभागाच्या केबीनमध्ये भाजपाच्या नगरसेवकांनी बैठक बोलवली. त्या बैठकीत एकाच वॉर्डात निधी जिरवल्याचा आरोप झाल्याने वादाला तोंड फुटले. सुरुवातीला एकेरी नंतर धराधरी. रागाच्या भरात पिस्तुल काढतो, गोळय़ा घालतो, असा प्रकार घडत असल्याने काहींनी तेथूनच फोन थेट मंत्र्यांना लावला. काहींनी सोडवा सोडवी केली, याबाबत शहरात अशीच चर्चा साताकरकर करु लागले. या बैठकीला केवळ पाचजणच होते. चार भिंतीत घडलेला प्रकार यापुर्वी कधीही बाहेर आला नव्हता. मंगळवारचा प्रकार काही क्षणातच बाहेर पडला. भाजपाचे नगरसेवक विजय काटवटे आणि गटनेते धनंजय जांभळे यांच्यामध्ये वाद झाल्याची ही चर्चा अजूनही खुमासदारपणे सुरु आहे.

यापूर्वी भाजपामधील अंतर्गत बाबी बाहेर पडत नव्हत्या. पण ही बाब काही क्षणातच बाहेर पडल्याने भाजपामध्ये फाटाफुट पाडण्यासाठी बाहेरच्या काहींनी सुपारीच घेतली गेली. त्यामुळे हा वाद घडल्याचीही चर्चा सुरु होती. दुसऱया दिवशी बुधवारी सकाळी नगरसेवक विजय काटवटे, सिद्धी पवार, आशा पंडित हे तिघे मुंबई येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून त्यांच्याजवळ झालेला प्रकार मांडल्याचे समजते. तर इकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी याची घटनेची माहिती मिळताच त्यांनी सर्वांना कराडला बोलवून घेतले. त्याच दरम्यान, तीन जणांची गैरहजेरी जाणवली. त्यामुळे भाजपाचे अगोदरच सहा नगरसेवक असून त्यामध्येही अशी फाटाफुट व घरातील भांडण वेशीवर टांगण्याचा प्रकार होत असल्यास भाजपा वाढण्याऐवजी शहरात भाजपाला घरघर लागल्याची चर्चा सुरु आहे.

Related posts: