|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आता कायदाच हाती घेऊ!

आता कायदाच हाती घेऊ! 

दोडामार्गला दारुबंदीसाठी पुन्हा पोलीस ठाण्यात धडक

प्रतिनिधी / दोडामार्ग:

दोडामार्ग तालुक्यातील दारुधंदे बंद करण्यासाठी वारंवार निवेदने देऊनसुद्धा त्याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी तालुक्यातील महिला सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱयांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. मात्र, यावेळी एकही अधिकारी उपस्थित नसल्याने कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. आजवर निवेदने खूप दिली. यापुढे पोलिसांनी दारुधंद्यांना आळा घातला नाही तर महिलाच कायदा हातात घेतील, असा इशारा देण्यात आला.

दोडामार्ग तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा दारुविक्री होते. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पोलिसांनी हे दारुधंदे बंद करावेत, यासाठी तालुक्यातील महिलांनी स्थानिक पोलिसांना अनेकवेळा निवेदने दिली. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट राजरोसपणे दारुधंदे सुरू आहेत. त्यामुळे पोलीस जाणुनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्याचा जाब विचारण्यासाठी सरपंच सेवा संघ तालुक्यातील महिलांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. मात्र, यावेळी एकही अधिकारी हजर नसल्याने दारुधंद्याच्या प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर यावेळी उपस्थितांनी नाराजी व्यक्त करत यापुढे निवेदन नाही तर महिलाच कायदा हातात घेतील, असा इशारा दिला.

यावेळी सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, कोनाळ सरपंच पराशर सावंत, मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस, खोक्रल सरपंच देव शेटकर, पाल पुनवर्सन सरपंच संगीता देसाई, झरेबांबर सरपंच स्नेहा गवस, पिकुळे सरपंच दीक्षा महालकर, सासोली सरपंच दीपाली धाऊसकर, विनिता घाडी आदी उपस्थित होते.

Related posts: