|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वीजप्रश्नी इन्सुली ग्रामस्थ आक्रमक

वीजप्रश्नी इन्सुली ग्रामस्थ आक्रमक 

वीज अधिकाऱयांना कार्यालयातच कोंडले : ग्रामस्थांची रात्रीच कार्यालयावर धडक : अखेर वीज वितरणकडुन नमते

प्रतिनिधी / बांदा:

इन्सुली नळपाणी योजनेकडील लाईट दोन दिवस नसल्याने बिलेवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले. उन्हाळय़ाच्या दिवसात गावाला पाण्याची गरज असताना वीज वितरण विभागाकडुन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जाणुनबुजून वेळ काढत असल्याचा आरोप करीत शनिवारी रात्री इन्सुली सबस्टेशन कार्यालयात धडक मारत सावतंवाडी तालुका अभियंता अमोल राजे बांदा अभियंता सुभाष आपटेकर यांना ग्रामस्थांनी कोंडुन ठेवले. जोपर्यंत ट्रान्सफॉर्मर गावात आणत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला कोणतेच काम करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत रात्री आठ ते साडे अकरा वा. पर्यंत दोन्ही अभियंत्यांना हलू दिले नाही. अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेकडे ताठर भूमिका घेतलेल्या वीज वितरण विभागाला नमते घेत ट्रान्सफॉर्मर रात्री उशिरा आणावा लागला. यावेळी बांदा अभियंता आपटेकर यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. ‘तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही घरी जा. आमच्याशी नीट बोलावेअसा सल्लाही यावेळी ग्रामस्थांनी दिला. तालुका अभियंता अमोल राजे यांच्या लेखी आश्वासनाअंती ग्रामस्थांनी माघार घेतली.

इन्सुलीबिलेवाडी येथे शुक्रवारपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. या भागात सुमारे 200 च्यावर वीज ग्राहक आहेत. तर अनेक शेतकऱयांची शेती पंप ही याच भागात आहेत. सध्या शेतीचे पीक अखेरच्या टप्प्यात असताना दोनतीन दिवस वीज गायब होण्याचे प्रकार सुरू आहे. चारपाच महिने शेतीत कष्ट करून ऐन पीक घेण्याच्या वेळी जर पाणी मिळत नसेल तर मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल. तसेच या ठिकमी सुमारे 1500 कुटुंबांची तहान भागविणारी नळपाणी योजना याच विजेवर अवलंबून आहे. शुक्रवारी सायंकाळी अचानक वीज वितरणच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्याने लाईट गायब झाली. येथील लाईनमन सचिन काष्टे, राठोड आणि पवार यांनी लाईट पूर्वरत करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानेचे लाईट गायब होती.

येथील ट्रान्सफॉर्मरवर गावची नळपाणी योजना अवलंबून आहे. हे येथील वीज वितरणच्या प्रशासनाला चांगलेच माहीत होते. मात्र, ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका दाखविल्याने प्रशासन गंभीर होता चालढकलपणा करीत बसेल. ग्रामस्थांना सायंकाळपर्यंत लाईट येईल, या आशेवर गप्प राहिले. मात्र, सायंकाळी प्रत्यक्षात याबाबतची चौकशी केली असता, त्याठिकाणी वीज वितरणकडून साधे ढुंकूनही बघितल्याचे पुढे आले. त्यामुळे येथील बिलेवाडी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. सायकाळी साडेसातच्या सुमारास इन्सुली सबस्टेशनच्या कार्यालयात सुमारे 60 ते 70 ग्रामस्थांनी धडक मारली. तेथील कर्मचाऱयांना जाब विचारला.

मात्र, आपल्याकडे काही नसून तुम्ही वरिष्ठांशी बोला, असा सल्ला येथील कर्मचाऱयांनी दिला. यावेळी ग्रामस्थ अमित सावंत यांनी अभियंता आपटेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर तालुका अभियंता अमोल राजे यांच्याशी संपर्क केला. आपण उद्या बसवितो असे त्यांनी सांगितले. तुम्ही येथे या आणि बोला. तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यानंतर काही वेळातच वीज वितरणचे राजे आणि आपटेकर यांनी कार्यालयाला भेट दिली. यावर ग्रामस्थांनी आपटेकर यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी राजे यांनी उपस्थित ग्रामस्थांना विनंती करीत आपण उद्या सकाळपर्यंत लाईट सुरू करू, असे सांगितले. मात्र, जोपर्यंत येथे ट्रान्सफॉर्मर येत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पवित्रा घेतला. उपसरपंच सदा राणे यांनी अमोल राजे यांना तात्काळ ट्रन्सफॉर्मर आणा, असे सांगितले. अखेर वीज वितरणच्या ताठर भूमिकेला ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेपुढे नमते घेत ठेकेदाराला रात्री अकरा वाजता ट्रान्सफॉर्मर येथे आणण्यास भाग पाडले. तर तुम्ही सकाळी किती वाजेपर्यंत लाईट सुरू करणार ते लेखी द्या, असे सुनावले. अभियंता राजे यांनी सकाळी साडे नऊपर्यंत लाईट सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली.

यावेळी उपसरपंच सदा राणे, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, सोसायटी चेअरमन काका चराटकर, संचालक हरी तारी, अमित सावंत, प्रवीण सावंत, गंगाराम कोठावळे, बाजो सावंत, संतोष मांजरेकर, बंटी सावंत, नरेंद्र सावंत, सुरेश शिंदे, नाना गावडे, रामू तारी, संदीप सावंत, अमेश कोठावळे, पॅलिक्स फर्नांडिस, प्रदीप सावंत, शिवा गावडे, अर्जुन गावडे, अजित गावडे, रवी कोठावळे, आपा कोठावळे, विश्वास सावंत, बापू सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

वीज वितरणकडून रविवारी ट्रान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही करण्यात आली. तर यापुढे परत या ठिकाणी विजेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्यास याद राखा, असे खडे बोल ग्रामस्थांनी सुनावले.