|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू

सीमाप्रश्नासाठी एकेकाळचे मित्र झाले कट्टर शत्रू 

बाबुराव ठाकुर पंतप्रधानांना म्हणतात, ‘मी तुमच्यासाठी हार आणला नाही’

स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय नेत्यांची मोठय़ा प्रमाणावर धरपकड झाली. त्यापैकी काही नेत्यांना कारागृहात डांबण्यात आले. नाशिक येथील तुरुंगात स्व. मोरारजी देसाई आणि स्व. बाबुराव ठाकुर एकाच कोठडीत होते. तब्बल दोन ते अडीच महिने हे उभयता एकत्र होते. साहजिकच संबंध आपुलकीचे होते. मात्र, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि सीमाप्रश्नावेळी बाबुराव ठाकुर यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना आपल्या लेखणीतून झोडपून काढण्याचे सत्र सुरू केले व या प्रश्नामुळेच कटूता निर्माण झाली. सीमावासियांचे कट्टर दुष्मनच अशी मोरारजींची संभावना सुरू केली.

1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई यांनी देशाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळीही बाबुराव ठाकुर यांनी त्यांचे अभिनंदन केले नाही की शुभेच्छाही दिल्या नाही. 1978 च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीवेळी जनता पक्षाच्या प्रचारासाठी मोरारजी देसाई 11 फेब्रुवारी 1978 ला बेळगावला आले होते. पंतप्रधान झाल्यानंतर पहिलीच भेट म्हणून सांबरा विमानतळावर त्यांचे कडेकोट बंदोबस्तात आगमन झाले.

हेलिकॉप्टरमधून खाली उतरताच मान्यवरांनी भले मोठे पुष्पहार घालून मोरारजींचे स्वागत केले. बाबुराव ठाकुर यांच्याशी पंतप्रधानांनी हस्तांदोलन केले. त्यावेळी बाबुराव ठाकुर म्हणाले, ‘मी तुमच्यासाठी हार आणलेला नाही,’ यावर मोरारजी म्हणाले, ‘संयुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय आपण मला कसा हार घालणार? यावेळी सर्वत्र हशा पिकला.

दुसरे एक उदाहरण देता येईल. सदाशिवराव कान्होजी तथा एस. के. पाटील हे त्या काळातील मुंबईचे अनभिषिक्त राजे. ते मूळचे मालवणचे. मुंबई महापौरपद सलग तीन वेळा मिळवून त्यांनी आपला दबदबा साऱया कोकणात निर्माण केला होता. देशभक्त शंकरराव गवाणकर यांनीच स. का. पाटील यांना शिक्षणासाठी मदत केली होती. श्रीमती माई ठाकुर यांचे वडील अर्थात बाबुराव ठाकुर यांचे सासरे या पार्श्वभूमीवर स. का. पाटील व बाबुराव ठाकुर यांच्यात स्नेहपूर्ण संबंध होते. तरीदेखील सीमाप्रश्नाबाबत विरोधी भूमिका घेतलेल्या स. का. पाटील यांची या संदर्भात कठोर भूमिका होती. मुंबई ही केंद्रशासित ठेवावी अशी स. का. पाटील यांची भूमिका, तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या धोरणावर बाबुराव ठाकुर यांची भूमिका ठाम होती. पंडित नेहरूंच्या निकटवर्ती वर्तुळात असलेल्या स. का. पाटील यांच्या संदर्भातही बाबुराव ठाकुर यांनी मोरारजीभाईंप्रमाणेच रोखठोक पवित्रा स्वीकारला होता.

या पार्श्वभूमीवर स्व. बाबुराव ठाकुर यांचा स्वाभिमानी बाणा शंभर नंबरी सोन्यासारखा खणखणीत होता. कट्टर विरोधक बनून पंतप्रधान येथे आल्यानंतर त्यांना पुष्पहारही न घालण्याची त्यांची भूमिका आजच्या कार्यकर्त्यांना आदर्श नव्हे काय? 

Related posts: