|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » देवनार कत्तलखान्यासाठी अननुभवी सल्लागार

देवनार कत्तलखान्यासाठी अननुभवी सल्लागार 

आधुनिकीकरण कामाला 600 कोटी रुपये खर्च करणार

कत्तलखाना सुस्थितीत नसल्याचा पालिकेचा दावा

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई महापालिकेने मुंबईकरांना शेळ्या, मेंढय़ा यांचे ताजे मांस उपलब्ध होण्यासाठी 64 एकर जागेत उभारलेल्या आणि आतापर्यंत तोटय़ात सुरू असलेल्या देवनार कत्तलखान्यासाठी 600 कोटी रुपयांपर्यंत खर्च करून आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मे. पेंटॅकल कन्सल्टंट प्रा.लि. या सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. मात्र, याप्रकारच्या कामाचा अनुभव या सल्लागाराला नसल्याचे पालिकेच्याच प्रस्तावातील माहितीवरून निदर्शनास येत आहे.

महापालिकेने यापूर्वीच या देवनार कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी नेमलेल्या मे.के.के. अँड असो. या सल्लागाराबरोबर 8.05 कोटींचा करारही करण्यात आला होता. मात्र, त्याच्याच विनंतीनुसार त्याला बाजूला काढून नवीन सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार असून त्यावर गंभीर स्वरूपाची चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देवनार येथील कत्तलखाना 1971 साली 64 एकरच्या पालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आला. मुंबईकरांना शेळ्या, मेंढय़ा, डुक्कर, म्हशी यांचे ताजे मांस उपलब्ध व्हावे आणि अनधिकृतपणे जनावरांची होणारी कत्तल थांबावी, हा यामागील उद्देश होता. सध्या हा कत्तलखाना सुस्थितीत नाही, असा पालिकेचा दावा आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण यामुळे कत्तलखान्यात चांगल्या पद्धतीने जनावरांची कत्तल व्हावी, मांसाची उपलब्धता वाढावी, विनापरवाना कत्तल रोखण्यात यावी, सोयी सुविधा वाढविण्यात याव्यात, यासाठी आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यानुसार या देवनार कत्तलखान्यात कारखाना क्षेत्रासाठी 21 एकर, पशुधन बाजार पेंद्रासाठी 19 एकर आणि जनावरांना चरण्यासाठी 24 एकर जागा ठेवण्यात येऊन आवश्यक विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कत्तलखान्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल

कत्तलखान्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता त्यात म्हशी, शेळ्या, मेंढय़ा, डुक्कर यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या कत्तलखान्याच्या बांधकामाची स्थिती चांगली नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच, उपहारगफह, परवानाधारक व्यापाऱयांची कार्यालयेही धोकादायक स्थितीत आहेत. व्यापारी कार्यालय पाडण्यात आले आहे. आता आधुनिकीकरण करताना प्रतिपाळी 600 म्हशी, प्रतिपाळी 6000 शेळ्या-मेंढय़ा, प्रतिपाळी 300 डुक्कर यांची कत्तल करण्याची क्षमता प्रस्तावित आहे. तसेच, मांस उपलब्ध करणे आणि मांस निर्यातीची क्षमता वाढविणे आदीवर भर देण्यात येणार आहे.

Related posts: