|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीत 27 पासून ‘मोती तलाव फेस्टिव्हल’

सावंतवाडीत 27 पासून ‘मोती तलाव फेस्टिव्हल’ 

सावंतवाडी नगरपालिका, सजग मंचाचे आयोजन

प्रतिनिधी / सावंतवाडी:

सावंतवाडी नगरपालिका व सजग नागरिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोती तलाव फेस्टिव्हल’ 27 ते 30 एप्रिल या कालावधीत येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे होणार आहे. या फेस्टिव्हलचे हे चौथे वर्ष आहे. फेस्टिव्हलचा उद्देश म्हणजे दुर्लक्षित फळे, फुले तसेच वनस्पतींवर लक्ष केंद्रीत करणे, आपल्या पारंपरिक कला-कौशल्यांचे जतन करणे, गावातील होतकरू महिला व शेतकऱयांना फेस्टिव्हलद्वारे नावीन्यपूर्ण उत्पादने समाजापुढे सादर करण्याची संधी देणे, पारंपरिक आणि स्थानिक वाणाच्या भाज्या, बियाणे, फळे, फुले याद्वारे निर्मित उत्पादने यांचे प्रदर्शन, विक्री व प्रबोधन करणे, हरित व्यावसायिक व हरित ग्राहक किंवा उपभोक्त्यांची संख्या वाढवणे आदी आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिकांच्या बरोबरच देशाच्या वेगवेगळय़ा भागातील तेथील स्थानिक जीवनशैलीच्या माध्यमातून यश प्राप्त करणाऱयांना या फेस्टिव्हलमध्ये आमंत्रित करण्यात येते. यावर्षीही जिल्हय़ाबरोबरच देशातील वेगवेगळय़ा भागातील उत्पादकांचे स्टॉल या फेस्टिव्हलमध्ये लावण्यात येणार आहेत. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये कर्नाटक राज्याचा मास्टर क्राफ्टमन पुरस्कारप्राप्त तसेच हरियाणा राज्य कलाश्री पुरस्कार प्राप्त कर्नाटकातील के. केंचय्या यांचा लाखेचा वापर करून लाकडी वस्तू निर्मितीचा स्टॉल व त्यांचे प्रात्यक्षिक असणार आहे. तसेच रोमानियाला निर्यात होणाऱया हस्तनिर्मित सुती पर्सचा बेळगावमधील महिलांचा दारोजी फॅब्रिक स्टॉल, वेगवेगळय़ा 25 प्रकारचे मध विक्रीसाठी मुंबईमधून व्यक्ती येणार आहेत. कोल्हापूरचे पारंपरिक घोंगडीवाल्याचा स्टॉल, आयुर्वेदिक औषधांचा दापोली येथे निर्मिती स्टॉल, पारंपरिक पौष्टिक पदार्थांची कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा महिला गट यांचा स्टॉल, काश्मिर राज्यातील सेंद्रीय अक्रोड व केशर विक्रीचा स्टॉल, राजस्थानमधील रामावतारसिंग यांनी पारंपरिक व नैसर्गिक बियांपासून साकारलेल्या ज्वेलरी यांचा स्टॉल व त्यांचे प्रशिक्षण, चरखा महिला सहकारी संस्था, बेळगाव यांचा खादी उत्पादनाचा स्टॉल, पिकांच्या गावरान वाणांचे संवर्धन करणारी बायफ संस्था, पुणे यांचा स्टॉल. कृषी विज्ञान केंद्र वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र, स्टोन पेंटिंग परब यांचे कंपोस्ट कल्चर-आपल्या कचरा व्यवस्थापन स्टॉल याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हय़ातील वेंगुर्ले कांदळवनांची सफर घडवून आणाऱया महिलांचा स्वामींनी महिला गट यांचा कांदळवनांचा वापर करून तयार केलेल्या पदार्थांचा स्टॉल, सावंतवाडीतील युवा हरित व्यावसायिक अद्वैत नेवगी यांचा फणस, बेलफळ आदी दुर्लक्षित फळांचे नावीन्यपूर्ण आईस्क्रीमचा स्टॉल तसेच जास्वंद, बेलफळ आदी फळांचे गुणकारी सरबताचा स्टॉल, कोकणाची ओळख करणारे शिरवाळे यासाठी पदार्थांचे स्टॉल खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. याबरोबरच सावंतवाडीतील इश प्रेमालाया-कॅन्सर हॉस्पिटलसच्या सिस्टरचा कॅन्सरविषयक जागृती करणारा स्टॉलदेखील असणार आहे. या महोत्सवात सर्वाधिक कलाकारांचे शास्त्राrय संगीत व वाद्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सजग नागरिक मंचाद्वारे करण्यात येत आहे.

यावेळी सचिन देसाई, दिलीप धोपेश्वरकर, ऍड. सुहास सावंत, सरोज दाभोलकर, बाबू कुडतरकर, अन्नपूर्णा कोरगावकर, राजू बेग, भारती मोरे, सुरेंद्र बांदेकर, माधुरी वाडकर, आनारोजीन लोबो आदी उपस्थित होते.

Related posts: