|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » भारती एअरटेल, इन्डस टॉवर्सचे होणार विलीनीकरण

भारती एअरटेल, इन्डस टॉवर्सचे होणार विलीनीकरण 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

भारती एअरटेलची उपकंपनी असणाऱया भारती एअरटेल आणि इन्डस टॉवर्स या कंपनीचे विलीनीकरण होणार असून संपूर्ण देशातील सर्वात मोठी टॉवर कंपनी उदयास येणार आहे. या दोन्ही कंपन्यांचे संयुक्तपणे उत्पन्न 25,360 कोटी रुपये असून दोघांकडे 22 दूरसंचार क्षेत्रात 1.63 लाख टॉवर्स आहेत. या नवीन कंपनीचे नाव इन्डस टॉवर्स लिमिटेड असे असून शेअर बाजारात सूचीबद्ध कायम राहील.

भारती इन्फ्राटेल आणि इन्डस टॉवर यांच्या विलीनीकरणास भारती एअरटेलने मंजुरी दिली. नवीन कंपनी चीनमधील कंपनीनंतर जगातील दुसऱया क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे. सध्या इन्डस टॉवर्समध्ये भारती इन्फ्राटेल आणि व्होडाफोन इंडियाचा प्रत्येकी 42 टक्के हिस्सा आहे. याव्यतिरिक्त आयडिया सेल्युलरचा 11.15 टक्के आणि अमेरिकेतील इक्विटी कंपनी प्रोव्हिडन्सकडे 4.85 टक्के वाटा आहे. आता या विलीनीकरणास भारतीय स्पर्धात्मक आयोग, सेबी, एनसीएलटी, दूरसंचार विभाग यांच्या मंजुरीची आवश्यकता असून 31 मार्च 2019 पर्यंत विलीनीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.