|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डॉ.लळीत यांचा ‘मालवणी नाटकाची समीक्षा’ ग्रंथ प्रकाशित

डॉ.लळीत यांचा ‘मालवणी नाटकाची समीक्षा’ ग्रंथ प्रकाशित 

प्रतिनिधी / कणकवली:

आडाळीचे (ता. दोडामार्ग) सुपुत्र तथा मालवणी बोलीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. बाळकृष्ण लळीत यांचे ‘मराठी रंगभूमीवरील मालवणी नाटकाची समिक्षा’ हे पुस्तक स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.

यापूर्वी डॉ. लळीत यांचे 1994 साली ‘मालवणी रंगभूमी आणि वस्त्रहरण’ पुस्तक प्रकाशित झाले होते. त्या छोटेखानी पुस्तकात डॉ. लळीत यांनी 1928 पासून पुढील काळात मराठी नाटय़लेखनात मालवणी बोली, बोलणारी पात्रे आणि संवाद कसे येत गेले, याचे विवेचन केले होते. त्या विवेचनाचा पुढचा आणि नव्या माहितीसह विस्तारित भाग म्हणून त्यांच्या या नव्या पुस्तकाकडे पाहता येईल. एक बोली म्हणून मराठी नाटय़वाङ्मयात मालवणी स्थानाचा विवेचक शोध डॉ. लळीत यांनी या पुस्तकात मांडला आहे.

मालवणी बोलीच्या लयदार ढंगामुळे शहरी प्रेक्षक मालवणी नाटकांकडे आकर्षित झाल्याने पुढील काळात या नाटकांच्या छापिल संहिताही प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यामुळे मावलणी साहित्य प्रवाहालाही गती मिळाली. या बाबी नोंदवत डॉ. लळीत यांनी पुस्तकात सुरूवातीलाच मालवणी नाटकांच्या वाटचालीचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. लोकनाटय़, नभोनाटय़, मुक्तनाटय़ यातील मालवणी बोलीची नोंद घेत मालवणी एकांकिकांचीही थोडक्यात माहिती दिली आहे. तसेच मालवणी नाटकांचे विषय वैविध्य व वैशिष्टय़े सांगत तब्बल 49 नाटके व पाच एकपात्री संहितांची यादी दिली आहे. त्यातील वस्त्रहरण व इतर महत्वाच्या नाटकांविषयी डॉ. लळीत यांनी विस्ताराने लिहिले आहे. एकूणच मालवणी नाटकाची संहिता आणि नाटय़प्रयोग यांच्यासंदर्भातील हा चिकित्सक आढावा नाटय़ अभ्यासकांबरोबरच सामान्य वाचकांसाठीही उद्बोधक ठरणारा आहे.

डॉ. लळीत यांची मालवणी बोलीचे ज्येष्ठ अभ्यासक अशी ओळख आहे. त्यांनी याच संदर्भात पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांच्या मालवणी बोलीच्या संशोधनामुळे मालवणी बोलीतील लिखित साहित्य आणि मौखिक परंपरेतील अनेक गोष्टी लोकांसमोर आल्या. त्यांचे ज्येष्ठ बंधू सतीश लळीत यांच्या सहयोगातून डॉ. लळीत हे मालवणी साहित्य संमेलन भरवत असून आता त्यांच्या ‘मराठी रंगभूमीवरील मालवणी नाटकाची समिक्षा’ या ग्रंथामुळे मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली आहे.