|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » राजमाता पार्वतीदेवी गौरव पुरस्कार सुषमा तायशेटे यांना

राजमाता पार्वतीदेवी गौरव पुरस्कार सुषमा तायशेटे यांना 

एक मे रोजी वितरण सोहळा

प्रतिनिधी / सावंतवाडी:

भारत सरकारच्या पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालयाच्या सहसचिव सुषमा तायशेटे यांना सावंतवाडीच्या राजमाता पार्वतीदेवीसाहेब प्रतिष्ठानच्यावतीने यंदाचा राजमाता पार्वतीदेवी साहेब स्मृती गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तायशेटे या मूळच्या कणकवली येथील आहेत. या पुरस्काराचे वितरण एक मे रोजी सायंकाळी 4 वाजता श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जिमखाना सभागृहात होणार आहे. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राजमाता सत्वशीलादेवी भोसले, अध्यक्ष खेमसावंत ऊर्फ बाळराजे भोसले, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शुभदादेवी भोसले यांनी या पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

खेमसावंत भोसले यांनी सांगितले की, राजमाता पार्वतीदेवी यांनी आपल्या रिजंट पदाच्या कार्याकाळात सावंतवाडी संस्थानात सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या निधनानंतर त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य त्यांनी पूर्ण करत आपला वेगळा ठसा जनमानसावर उमटविला. त्यांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, या उद्देशाने त्यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे. समाजासाठी योगदान देणाऱया आणि समाजाला प्रेरणा देणाऱया महिलेला दरवर्षी हा पुरस्कार दिला जाईल. यातून महिलांना कार्य करण्याची प्रेरणा मिळेल.

राजमाता पार्वतीदेवी भोसले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे पुस्तक एक मे रोजी प्रकाशित केले जाणार असल्याचेही बाळराजे भोसले यांनी सांगितले. यंदा पुरस्कार जाहीर झालेल्या सुषमा तायशेटे या कणकवली तालुक्यातील रामगड येथील आहेत. त्या भारत सरकारच्या पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालयात सहसचिव आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध विभागात काम करून तेथे आपला ठसा उमटविला. सिंधुदुर्गच्या कन्येने राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना यंदा हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

विद्यार्थिनींचाही गौरव

राणी पार्वतीदेवी जयंतीनिमित्त शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी बजावलेल्या पंचम खेमराज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये राधा कालिदास बर्वे (एमएस्सी प्राणीशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठात सुवर्णपदक, 2017), अमृता अशोक देसाई (एमकॉम परीक्षेत मुंबई विद्यापीठात सुवर्णपदक, 2017), स्नेहा अनिल तिळवे (मुंबई विद्यापीठ महिला कबड्डी संघाची कर्णधार व उत्कृष्ट खेळाडू, 2017), तनया रामचंद्र वाडकर (राष्ट्रीय स्तरावर रायफल शूटींग स्पर्धेत हैद्राबाद आंध्रप्रदेश येथे सुवर्णपदक प्राप्त तसेच 2016 एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत 100 टक्के गुण प्राप्त केलेली विद्यार्थिनी) यांचा समावेश आहे.

या समारंभाला संस्थानप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन राजमाता पार्वतीदेवी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शुभदादेवी भोसले यांनी केले आहे. यावेळी लखम भोसले, प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, अन्वर खान, किरण भोसले, प्रा. गणेश मर्गज, प्रा. बी. एन. हिरामणी, प्रा. प्रतीक्षा सावंत आदी उपस्थित होते.