|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नगर जिल्हय़ात पुन्हा दुहेरी हत्याकांड

नगर जिल्हय़ात पुन्हा दुहेरी हत्याकांड 

प्रतिनिधी /नगर :

जिल्हय़ातील जामखेड-बीड रोडवरील एका हॉटेलमध्ये बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची गोळय़ा घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केडगावपाठोपाठ जामखेड येथे झालेल्या या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने नगर जिल्हा पुन्हा हादरला. मोटारसायकलवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन अज्ञातांनी गोळय़ा झाडून ही हत्या केल्याचे समोर आले असून, हत्याकांडात बळी गेलेले दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली असल्याचे मानले जात आहे.

योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात अशी हत्या झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. जामखेड शहरातील बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर एका हॉटेलमध्ये योगेश राळेभात व राकेश राळेभात हे मित्रांसोबत बसले होते. शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी तीन अज्ञात हल्लेखोर आले. यातील तीन जणांपैकी एक जण मोटारसायकलवरून खाली उतरला आणि त्याने योगेश राळेभात (29) याच्यावर समोरून छातीमध्ये गोळय़ा झाडल्या. योगेश यांचा मित्र राकेश राळेभात (28) हा मदतीसाठी धावला असता त्याच्याही छातीवर हल्लेखोराने एक गोळी झाडली. यानंतर संबंधित हल्लेखोर पुन्हा मोटारसायकलवर बसून बीड रोडच्या दिशेने पळून गेले. योगेश आणि राकेश हे दोघेही मोरेवस्ती येथील रहिवासी आहेत.

रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या या दोघांना घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने नगर येथे हलवण्यात आले. मात्र, नगर येथे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

 दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच पालकमंत्री राम शिंदे रुग्णालयात पोहोचले असता त्यांना नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या घटनेमुळे जामखेड येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शवविच्छेदनासाठी दोघांचे मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

जामखेडमध्ये कडकडीत बंद

दरम्यान, या हत्याकांडाच्या निषेधार्थ जामखेड येथे रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी रविवारी भेट देऊन जिल्हय़ातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. पालकमंत्री राम शिंदे यांचा पोलीस प्रशासनावर वचक राहिला नसून, हत्याकांडाच्या घटनेची जबाबदारी स्वीकारून शिंदे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, मधुकर राळेभात, दत्ता वारे, अरूण कडू, शहाजी राळेभात, डॉ. भास्कर मोरे, नगरसेवक अमित जाधव आदी उपस्थित होते. याप्रकरणी मयताचा भाऊ कृष्णा राळेभात याने गोविंद गायकवाड यांच्यासह 4 ते 5 जणांविरुद्ध जामखेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा स्पष्ट इशारा मृतांच्या नातेवाईकांनी दिला होता.