|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चितळ विहिरीत पडून जखमी

चितळ विहिरीत पडून जखमी 

पाटगाव/वार्ताहर :
कारीवडे (ता. भुदरगड) येथे बिबटय़ाने पाठलाग केल्याने चितळ विहिरीत पडून किरकोळ जखमी झाले आहे. चितळास स्थानिक शेतकऱयांच्या मदतीने विहिरी बाहेर काढण्यात वन विभागास यश आले आहे. चितळावर तिरवडे येथे वनविभागाच्या कार्यालयात प्राथमिक उपचार केल्यावर पाटगांवच्या जंगलात सोडण्यात आले.
शनिवार 28 रोजी दुपारी बारा वाजता कारीवडे येथील कुंभारकी या शेतात गणपती भाऊ दिवेकर यांच्या मालकीच्या विहिरीत चितळ पडल्याचा आवाज तेथे शेजारीच शेतात काम करणाऱया जयराम कांबळे, बळवंत कांबळे व युवराज कांबळे याना आला. त्यावेळी त्यांनी दोरीच्या सहायाने दोन तासांच्या प्रयत्नांनी चितळास बाहेर काढले. बाहेर पडताच क्षणी चितळाने जंगल परिसरात धूम ठोकली. चितळाचे प्राण वाचवल्याच्या आनंदात शेतकरी पुन्हा आपल्या कामास लागले. सायंकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास चितळ गेलेल्या दिशेस बिबटय़ाच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्याने शेतकरी घराकडे परतत असताना त्याच कुंभारकी परिसरातील अर्जुन कृष्णा आदित्य यांच्या मालकीच्या तीस फूट खोली व पंचवीस बाय तीस लांबी रुंदी असणाऱया विहिरीत पुन्हा तेच चितळ बिबटय़ाच्या भीतीने पडल्याचे स्थानिक शेतकऱयांना दिसले त्यांनी दोराच्या सहायाने पुन्हा त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु चितळ जखमी झाल्याने व दिवसभर झालेल्या दमछाकने अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी वनपाल बी. एस. पाटील यांना युवराज कांबळे यांनी कळवले. रात्री तातडीने वनक्षेत्रपाल संदेश पाटील, वनरक्षक रणजित पाटील, किरण पाटील, जॉन डिसोझा, अनिल कुंभार, बी. ए. पाटील, वनमजुर बबन लॉड्रीक्स, आबिटकर ही टीम कोंडुशी वनपरिसरात हत्तींच्या मागावर असलेली टीम घटनास्थळी दाखल झाली.
घटनास्थळी क्रेन जाणे शक्य नसलेने दोराच्याच सहायाने चितळास काढण्याचे प्रयत्न केले. अखंड रात्रभर स्थानिक शेतकरी जयराम कंबळे, युवराज कंबळे व गणपती भाऊ दिवेकर यांनी पराकोटीचे प्रयत्न करून तब्बल बारा तासानंतर रविवारी सकाळी सात वाजता चितळास पकडून विहिरी बाहेर काढण्यात वन विभाग व स्थानिकांना यश आले.