|Monday, April 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मतखरेदीचा प्रकार दिनाकरन यांच्या अंगलट?

मतखरेदीचा प्रकार दिनाकरन यांच्या अंगलट? 

वृत्तसंस्था /चेन्नई :

अण्णाद्रमुकचे बंडखोर नेते टीटीव्ही दिनाकरन यांनी आरके नगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाच दिल्याची चर्चा मागील वर्षी रंगली होती. दिनाकरन यांनी या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविली होती. दिनाकरन यांनी स्वतःवरील आरोप नेहमीच फेटाळले असले तरीही रविवारी त्यांना मतदारसंघात विचित्र स्थितीला तोंड द्यावे लागले. महिलांच्या एका गटाने हातात 20 रुपयांची नोट घेत त्यांना घेराव घातला.

या महिलांनी दिनाकरन यांच्याकडे 10 हजार रुपयांची मागणी केली. निवडणूक प्रचारावेळी दिनाकरन यांनी 10 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते असे या महिलांचे म्हणणे होते. या घटनेमुळे तेथे मोठा गोंधळ उडाला आणि पोलिसांना या महिलांना शांत करावे लागले. या निदर्शनामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली.

समर्थकांना याप्रकारचे आश्वासन कधीच दिले नव्हते. ई. मधुसूदनन यांचे हे कृत्य असावे, त्यांनीच या महिलांना निदर्शनांसाठी प्रवृत्त केले असावे असा आरोप दिनाकरन यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आरके नगर पोटनिवडणुकीत मधुसूदनन हे अण्णाद्रमुकचे उमेदवार म्हणून उभे होते.

त्वरित कारवाई न करणे आणि महिलांची निदर्शने सुरूच राहिल्याने दिनाकरन यांनी पोलिसांवर देखील टीका केली. पोलिसांनी हे प्रकरण जलदपणे हाताळणे गरजेचे होते. अशाप्रकारच्या निदर्शनांना अनुमती कशी मिळू शकते असा प्रश्न दिनाकरन यांनी उपस्थित केला. दिनाकरन यांनी अलिकडेच अम्मा मक्कल मुनेत्र कझगम हा राजकीय पक्ष स्थापन केला आहे.

 

Related posts: