|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सत्तरीत निसर्गसंपदेचे रक्षण गावकऱयांनीच केले…

सत्तरीत निसर्गसंपदेचे रक्षण गावकऱयांनीच केले… 

उदय सावंत/ वाळपई

सत्तरीच्या निसर्गाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना आतापर्यंत हे नैसर्गिक संचित अबाधित राखण्यात स्थानिकांचे महत्त्वाचे योगदान असून यामुळे निर्माण झालेले पर्यावरण संतुलन भविष्यातील अनेक समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार आमिर खान यांनी स्पष्ट केले.

 ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या सिनेमाच्या चित्रिकरणासाठी गेल्या चार दिवसांपासून आमिर खान सत्तरीतील विविध भागांमध्ये चित्रिकरणात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे. रविवारी सायंकाळी काहीकाळ त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सत्तरीच्या निसर्गाबद्दल आपुलकीची भावना व्यक्त केली.

 गावातील लोकांनीच जपले पर्यावरण

पर्यावरणावर दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात आक्रमण होताना दिसत आहे. याचे गंभीर परिणाम वेगवेगळय़ा क्षेत्रावर होताना दिसतात. देशातील महानगरांमध्ये जनता आज प्रदुषणाच्या होमकुंडात जळताना दिसत आहे. यामुळे ग्रामीण भागातील पर्यावरण हा एकमेव मार्ग सध्यातरी जीवनाला आनंद देणारा ठरणार आहे. सत्तरी तालुक्यामध्ये असलेले संचित व या भागातील नागरिकांनी आपल्या पूर्वापार परंपरेनुसार संवर्धित करून ठेवलेले पर्यावरण यामुळे येणाऱया काळात याचा अनुकूल परिणाम आपणास पाहावयास मिळणार आहे. अशा प्रकारची समृद्ध जंगले आज देशाच्या अवघ्याच भागांमध्ये शिल्लक असून या जंगलांवर मानवी अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे अमीर खान म्हणाले.

युवा पिढीने निसर्गसंपदेचे संवर्धन करावे

मानवी जीवन व नैसर्गिक संतुलन यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केल्यास आपली भावी पिढी सुखदायक जीवन जगू शकेल. यासाठी आत्ताच्या पिढीने पर्यावरण समतोल व नैसर्गिक संपदा यांचा समृद्ध वारसा जपण्यासाठी योगदान देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कारण आज मानवी जीवनाला आधुनिक होण्याच्या अपेक्षा वाढल्याने पारंपरिक गावांचे रुपांतर शहरीकरणामध्ये होत असल्याने मोठय़ा प्रमाणात नैसर्गिक संपत्तीवर आघात होताना दिसत आहे. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी जागरुक राहून अशाप्रकारचे प्रयत्न हाणून पाडणे अत्यंत गरजेचे आहे. तसे झाल्यास येणाऱया काळामध्ये आपणाला मोठय़ा शहरांमध्ये निर्माण झालेल्या प्रदूषणापासून मुक्ती मिळू शकेल, असे ते म्हणाले.

सिनेमात झळकणार सत्तरीचा निसग&

आपल्या चार दिवसांच्या चित्रिकरणाबाबत अनुभव कथन करताना त्यांनी सांगितले की, गेल्या चार दिवसांत त्यांना निसर्गसंपन्न वातावरणामध्ये राहून एक वेगळाच आनंद अनुभवण्याची संधी मिळाली आहे. असा निसर्ग सिनेमा चित्रिकरणासाठी आकर्षण ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निखळ वाहणारी नदी व समृद्ध जंगल परंपरा यामुळे सिनेमात सत्तरीतील अनेक ठिकाणे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, पावसाळय़ामध्ये सत्तरीच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये असणारे विहंगम दृष्य खरोखर पर्यटनासाठी चांगल्या प्रकारची संधी निर्माण करून देणारे असल्याने शासकीय पातळीवर याची गांभीर्याने दखल घेतल्यास सत्तरीचा परिसर देशातील निसर्ग पर्यटन स्थळांमध्ये समाविष्ट होऊन महत्त्वाचे स्थान प्राप्त करू शकतो.

‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या नवीन सिनेमातून सत्तरीचा निसर्ग जागतिक स्तरावर जाणार असल्याने येणाऱया काळात येथे निसर्ग पर्यटनाला आणखी वाव मिळणार आहे. चांगल्या चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक निसर्ग सौंदर्य सत्तरीत भरपूर आहे.

आपल्या जीवनशैलीला विकासाची किनार असलीच पाहिजे मात्र सदर जीवनशैलीच्या माध्यमातून याचा प्रतिकूल परिणाम आपल्या निसर्गावर व पर्यावरणावर होणार नाही, याची गांभीर्याने दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. सत्तरी तालुक्यातील जनतेने अशा प्रकारची विचारसरणी आतापर्यंत मनामध्ये लावून धरल्याने या निसर्गाची सुंदरता अबाधित राहिली आहे. याचे सर्व श्रेय या भागातील अनेक पिढय़ांना जाते, अशा भावनाही आमिर खान यांनी यावेळी व्यक्त केल्या.