|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » प्रदूषणाच्या विळख्यात महानगरे

प्रदूषणाच्या विळख्यात महानगरे 

विसाव्या शतकातल्या दोन महायुद्धांनी जगाचा नकाशा बदलला. हिरोशिमा, नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले, त्याचे भयावह परिणाम जगाने अनुभवले. त्यानंतरही कोणत्या ना कोणत्या भूमीवर युद्धे होतच राहिली. जगाच्या आकाशात अनेकवेळा महायुद्धाचे ढग दाटून आले,पण ते वेळीच पांगलेसुद्धा. नागरीकरण हा संस्कृतीच्या विकासाचा अविभाज्य भाग असतो. औद्योगिकीकरणानंतर जगभरात नागरीकरणाचा वेग वाढला. शहरांचे रुपान्तर महानगरांमध्ये होण्याची प्रक्रिया विसाव्या शतकामध्ये सुरू झाली, त्याचा आधारही औद्योगिकीकरण हाच होता. औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या, परिणामी स्थलान्तराचे प्रमाण वाढले. मुंबई, कोलकता, दिल्ली यासारख्या महानगरांचे महत्त्व विसाव्या शतकातच वाढले हा योगायोग नक्कीच नव्हता.  पारंपरिक ग्रामीण व्यवस्थेपेक्षा महानगरांचे स्वरुप वेगळे असते. महानगरांमध्ये रोजगार आणि विकासाच्या संधी अधिक असतात. त्यामुळे देशभरातून लोक महानगराकडे धाव घेत असतात.  कालान्तराने परिस्थिती बिकट होते. बाहेरून येणारे लोक सामावून घेण्याची महानगरांची क्षमता अपुरी पडते. कारण प्रश्न केवळ वाढत्या लोकसंख्येपुरता मर्यादित नसतो. मूलभूत सोयीसुविधा पुरविणे नियंत्रणाबाहेर जाते. प्रचंड दारिद्रय़ आणि प्रचंड श्रीमंती यांच्यामध्ये महानगर हेलकावे घेत राहते. दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांमधील लोकांचे जगणे म्हणजे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशीच आहे. अनिश्चितपणाच्या कोणत्या टोकावर ही महानगरे वावरत आहेत, याचे अनुभव लोकांना सातत्याने येत असतात. तासभराचा प्रचंड पाऊस रस्त्यांची गटारे करण्यासाठी पुरेसा ठरतो. लोकलचा अपघात संपूर्ण मुंबईकरांचे  जनजीवन विस्कळीत करून टाकतो. या महानगरांनी प्रदूषणाच्या धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालात देशाची राजधानी दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित महानगर ठरविले आहे. तर आपली मुंबई पाचव्यावरून चौथ्या स्थानावर पोहचली आहे. जगातल्या पहिल्या पाच प्रदूषित महानगरांमध्ये दोन आपल्याच देशातील असावीत, हे आपले दुर्दैव.  पण दिल्ली, मुंबई ही प्रदूषणाच्या जात्यात असली तरी जवळपास प्रत्येक राज्यातल्या राजधानीची प्रमुख शहरे सुपात आहेत असे म्हणावे लागेल. पणजी, पुणे, औरंगाबाद, नाशिक यासारखी झपाटय़ाने विकसित झालेली नगरे सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यातच आहेत, हे नाकारता येणार नाही. असे म्हटले जाते की निम्म्या जगाचे नागरीकरण झाले आहे. त्या न्यायाने जवळपास सर्वच महानगरे, शहरे प्रदूषित बनली आहेत. लोकसंख्येची प्रचंड दाटी, सोयी सुविधांचा अभाव किंवा यांच्या उलट साधन सुविधांची प्रचंड चंगळ,  गुन्हेगारी, त्यात निम्नस्तरीय गुन्हेगारी आणि तथाकथित व्हाईट कॉलर, लँड माफियाची गुन्हेगारी दोन्हीचा समावेश होतो. महानगराचे हे असे बहुरंगी चित्र  जगाच्या पाठीवर कुठेही दिसेल. सर्वात गंभीर बाब म्हणजे महानगरातल्या लोकांचे खालावत निघालेले आरोग्य. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात यासंदर्भात दिलेला धोक्याचा इशारा महत्त्वाचा आहे. दहापैकी नऊ लोक  प्रदूषित हवेमुळे श्वसनाच्या विकाराने त्रस्त आहेत. वर्षाला जवळपास 70 लाख लोकांचा मृत्यू प्रदूषित हवेमुळे होतो हे वास्तव लक्षात घेतले तर हिरोशिमा, नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा किती भयावह परिस्थिती मानवाने स्वतःहून ओढवून घेतली आहे ते लक्षात येईल.  त्याची कारणे अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे असमतोल विकास धोरण.  गाव आणि शहर अशा दोन्ही स्तरांवर हा समतोल साधणे आवश्यक होते. दुर्दैवाने तसे झाले नाही. उदा. शिक्षण या घटकाचा त्याअर्थाने विचार करता येईल. सरकारी धोरण आणि प्रोत्साहनामुळे खेडोपाडी शिक्षण उपलब्ध झाले. त्यातून तरुणवर्ग सुशिक्षित झाला. पण तो गावात राहिला नाही. रोजगारासाठी म्हणून तो शहरात आला आणि तिथलाच झाला. शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा होता. पण नव्या पिढीला शिक्षण मिळाले ते कृषी संस्कृतीपासून तोडणारे होते. परिणामी शेती म्हणजे अशिक्षित, अर्धवट शिकलेल्या लोकांनी नाईलाजाने करण्याचा व्यवसाय बनला. सुशिक्षित तरूण ज्या शहरात गेला तिथेही त्याच्या वाटय़ाला संघर्ष होताच. ज्या शहरात तो राहिला ते शहर वेगाने विस्तारत होते. मात्र त्या विस्तारात नियोजनाचा अभाव होता. प्रामाणिकपणे नोकरी, रोजगार धंदा करावा अशी परिस्थिती तेथे राहिलेली नव्हती. शहर गुंड, मवाली, अनैतिक धंदे करणारे दलाल यांच्या ताब्यात गेले होते.  शहरालगतच्या जमिनींचे भाव वाढत होते. बांधकामे वाढत होती. मात्र या शहरात पाणी, रस्ते, गटारी अशा प्राथमिक सुविधांचा अभाव होता. शहर अधिकाधिक श्रीमंत होत आहे असे वाटत होते. प्रत्येकाच्या हाती मोबाईल खेळत होते.
मॉल्समधून गर्दी वाढत होती. दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वेगाने वाढत होती आणि पार्किंगचे प्रश्न गंभीर बनत होते. कचऱयाच्या विल्हेवाटीचे प्रश्न गंभीर बनले होते.  सांडपाणी प्रक्रियेअभावी जलप्रदूषण वाढले होते. गेल्या दोन-तीन दशकांच्या कालावधीत खासकरून 1990 नंतर वेगाने बदललेले शहरांचे हे चित्र आहे.  हवा पाणी यांचे प्रदूषण हा प्रदूषणाचा भाग झाला. पण त्याबरोबर एकूणच समाजातले, शिक्षणातले, राजकारणातले प्रदूषण याविषयी फारसे कधी बोलले जात नाही. त्याचा थेट नसला तरी अप्रत्यक्षरित्या पर्यावरणाशी संबंध असतोच. हवा, पाणी यांच्या प्रदूषणाचे मोजमाप करता येते. पण इतर क्षेत्रातल्या प्रदूषणाचे मोजमाप करण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. तसे करता येणे अशक्यच. तरीही प्रत्येकाने आपण ज्या पर्यावरणाचे भाग आहोत, तिथेतरी किमान जगण्यालायक परिस्थिती राखण्याचा प्रयत्न केला तरी पुष्कळ साध्य होईल.  प्रदूषणाचा प्रश्न केवळ महानगरांपुरता मर्यादित नसून तो अवघ्या मानवी जीवनालाच व्यापून राहिलेला आहे.