|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वळीवाने शहरासह उपनगराला झोडपले

वळीवाने शहरासह उपनगराला झोडपले 

गारा वेचण्यासाठी महिला व बालचमुंची धावपळ

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या वळीवाने रविवारी दमदार हजेरी दिली आहे. जोरदार वाऱयासह ढगांचा गडगडाट व वीजेच्या कडकडाटय़ासह दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान पावसाचे जोरदार आगमन झाले. तब्बल 1 तासाहून अधिक वेळ पावसाने शहरासह उपनगराला झोडपले. या आलेल्या दमदार पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. महत्वाचे म्हणजे निवडणुकीचा प्रचार करणाऱयांना याचा  अधिक फटका बसला आहे.

रविवारी सकाळपासूनच उष्म्यामध्ये मोठी वाढ झाली होती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. पाऊस होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. त्या अपेक्षानुसार पावसाचे आगमन झाले आहे. या झालेल्या दमदार पावसामुळे हवेमध्ये काही काळ गारवा निर्माण झाला होता. रविवार असल्याने बाजारहाटसाठी आलेल्या अनेकांना पावसामुळे आडोसा शोधावा लागला. तर दुचाकीस्वारांना आपली वाहने रस्त्यावरच पार्किंग करुनच आडोसा घ्यावा लागला.

या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शहरातील कॅम्प येथे ग्लोब चित्रपट गृहाच्या आवारात आणि समोरील रस्त्यावर तलावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना साऱयांची दमछाक उडत होती. अलिकडचा हा पहिल्याचा पाऊस असल्यामुळे छत्री किंवा रेनकोट नसलेल्यामुळे अनेकांना भिजतच आपली घरी गाठावी लागली. साचलेल्या पाण्यातून  वाहन चालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. यामधून वाहन नेताना इतर वाहनांवर पाणी उडत होते.

टिळकवाडी भागातही बऱयाच ठिकाणी रस्त्यावरुनच पाणी वाहताना दिसत होते. गटारी  व ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरुनच वाहत होते. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. या पाण्यातूनच पादचाऱयांना वाट काढावी लागत होती. या पाण्यातून वाट काढताना वृध्दांना व महिलांना आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला. पावसामुळे तुंबलेल्या या पाण्यातून वाट काढण्यासाठी बरेचजण हातीत चप्पल घेवूनच वाट काढत असल्याचे चित्र दिसत होते. गटारीतील प्लास्टीक पिशव्या इतर साहित्य पावसामुळे रस्त्यांवर आले होते. यामुळे वाटकरुनां वाट काढणेही कठीण बनले होते.

भाजी विपेत्यांना फटका

शहरातील भाजीविपेते, फळविपेते यांना या पावसामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्यावरुन पाणी वाहत असल्यामुळे भाजी आणि फळे कोठे ठेवायची? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होता. याचबरोबर भिजतच त्यांना आवराआवर करावी लागत होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही या पावसामुळे मोठा त्रास सहन करावा लागला.

मारुती गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, भेंडीबाजार, रविवार पेठ, कलमठ रोड, या परिसरात गटारी तुडूंब भरुन पाणी रस्त्यावरुन वाहताना दिसत होत्या. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. बाजार पेठेत तर या पावसामुळे दलदल निर्माण झाली होती. भाजीमार्केटमध्येही ही दलदल निर्माण झाली होती. यामुळे ये-जा करणाऱयांना या दलदलीचा मोठा त्रास सहन करावा लागला होता.

गारांवेचण्यासाठी बालचमुंची धावपळ

पावसाला सुरुवातीला गाराही मोठय़ा प्रमाणात पडल्या. त्या गारा वेचण्यासाठी बालचमुंसह महिलावर्गही रस्त्यावर धावत होते. गारा पडताच मुले आनंदाने ती उचलून घेत आपल्या तोंडात घालत होती. या गारा वेचण्यासाठी साऱयांची धडपड चालली होती.  लहान मुले, तरुणी आणि महिला गारा वेचण्यास पावसात भिजतच धावताना दिसत होत्या. गारा घेवून आडोशाला येवून त्या खावून त्यानंतर पुन्हा गारा गोळा करण्याचा आनंद लुटताना मुले दिसत होती.

उपनगरांमध्ये पाणीच पाणी

शहराबरोबरच उपनगरांनाही वळीवाने झोडपले. यामुळे सखल भागामध्ये पाणीच पाणी झाले होते. या पाण्यामधून लहान मुले ये-जा करत होती. एक वेगळा आनंद लुटताना दिसत होते. सुट्टी असल्यामुळे आनंद लुटताना दिसत होते. परीक्षा झाल्या आहेत. त्यामुळे आता भिजलो तरी त्याचा काही परिणाम होणार नाही, असे म्हणत बालचमु या पावसामध्ये भिजून आनंद घेत होते. यामध्ये महिलावर्गाचाही सहभाग दिसत होता.

प्रचार करणाऱयांना फटका

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. आता केवळ चारच दिवस प्रचारासाठी उरले आहेत. त्यामुळे अनेक राष्ट्रीय पक्षाबरोबरच अपक्षांनी सभा व रॅलींचे आयोजन केले होते. मात्र या दमदार पावसामुळे त्यांच्या सभा आणि रॅलीचा प्रचार खोळंबला होता. प्रचार करणाऱया समर्थकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. बरेच जण घसरुनही पडत होते. निवडणुकी पुर्वीच काही जण पडत असल्याच्या चर्चाही सुरु होत्या.