|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » पुरंदर विमानतळाला केंद्राचा हिरवा कंदील

पुरंदर विमानतळाला केंद्राचा हिरवा कंदील 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुरंदर विमानतळाला केंद्रीय वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूरीच्या पक्षावर स्वाक्षऱया करून हिरवा कंदील दिला आहे. या संदर्भात काल राज्य शासनाने तातडीने भूसंपादनाचा अध्यादेश काढला.

राज्य शासनाने पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनाला प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे विमानतळासाठी प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत 6 एप्रिल रोजी मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार दोन हजार 367 हेक्टर जमीन संपादनासाठी तीन हजार 513 कोटी रूपयांच्या मंजुरीचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राजगुरूनगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी मंजूर बीज भांडवलापैकी 96.56 कोटी निधी आतापर्यंत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यात आला असून त्यातील खर्च न झालेला 95.80 कोटी निधी पुरंदर विमानतळाच्या विकास कामासाठी वर्ग करण्यात आला आहे. संरक्षण विभागाकडून पुरंदर विमानतळाला चालू वर्षांत जानेवारी महिन्यात मान्यता प्राप्त झाली. तर, गेल्या आठवडय़ात केंद्र शासनाच्या सुकाणू समितीने विमानतळाच्या जागेला मंजुरी दिली. त्यामुळे विमानतळ मंजुरीचे सर्व अडथळे दूर झाले असून केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी विमानतळ मंजुरीच्या पत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर राज्य शासनाने बुधवारी तातडीने भूसंपादनाचा अध्यादेश काढला. राज्य शासन आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्मयातील सहा जागांची पाहणी करण्यात आली होती. पुरंदर तालुक्मयातील मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी, पारगाव, खानवडी आणि उदाची वाडी या सात गावांमधील सुमारे दोन हजार 367 हेक्टर जमीन संपादनाचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून सादर करण्यात आला. जमीन मोबदल्यासाठी सुमारे दोन हजार 713 कोटी रूपये, तर फळझाडे, विहिरी इत्यादींसाठी सुमारे आठशे कोटी रूपयांचा मोबदला अपेक्षित असल्याचे शासनाला कळवण्यात आले होते.