|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वारणाप्रश्नी खासदार शेट्टींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वारणाप्रश्नी खासदार शेट्टींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

वारणा योजनेच्या प्रश्नावर प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली कोल्हापूर व सांगली जिह्यातील लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घ्यावी व सर्वमान्य तोडगा काढावा. अशा आशयाचे निवेदन खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी लवकरच एक बैठक घेवून सर्वमान्य तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

निवेदनाचा आशय असा, इचलकरंजीसाठी अमृत योजनेअंतर्गत मंजूर झालेली वारणा योजना दानोळी व वारणाकाठच्या गावातील विरोधामुळे सुरू होवू शकली नाही. या योजनेतून  पाणी उपसा झाल्यास वारणाकाठच्या गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडून शेतीला पाणी  कमी पडेल या भितीने हा विरोध होत आहे. यानंतरही  गेल्या आठवडय़ात पोलिस बंदोबस्तात काम सुरु करण्याचा प्रयत्न केला पण याविरोधत कोल्हापूर व सांगली येथील 40 गावातील लोकांनी याला विरोध केला आहे. यामुळे इचलकरंजी व कोल्हापूर सांगली जिह्यातील खेडी असा विनाकारण संघर्ष उभा राहिला आहे.

वास्तविक पाहता इचलकरंजी शहरास पंचगंगा नदीच्या प्रदुषणामुळे काविळ व इतर साथीच्या आजाराने 40 लोकांना प्राण गमावावा लागला होता. तसेच या शहरास सध्या होणार पाणीपुरवठा अपुरा असल्यामुळे पाणीटंचाई निर्माण होत आहे. या सर्व बाबींचा विचार होवून इचलकरंजीसाठी स्वच्छ व मुबलक पाण्याच्या पुरवठा होण्याच्या दृष्टीने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली वारणा बचाव कृती समिती, इचलकरंजी नगरपालिका प्रतिनिधी व संबंधीत लोकप्रतिनिधी यांची बैठक घेवून लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही लवकरच अशी बैठक आयोजीत करण्याचे आश्वासन दिले आहे.