|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल करण्यासाठी बच्चे कंपनीला वायूचे निमंत्रण

उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल करण्यासाठी बच्चे कंपनीला वायूचे निमंत्रण 

एक कोवळं रोपटं… त्याच्या जागेवर आनंदाने डोलणारं…. अचानक उपटून दुसरीकडे पेरलं तर काय होईल त्याचं? कोल्हापुरात आपल्या घरात.. अंगणात… मित्रांमध्ये…रमलेला हा मुलगा…वायू…. त्याला अचानक उचलून मुंबईत आईवडिलांनी आणलं… गोंधळलेल्या… घुसमटलेल्या वायूच्या मनात आलेला हा वैताग…श्या… कुठे येऊन पडलो यार….श्या…

उन्हाळय़ाची सुट्टी म्हणजे लहान मुलांसाठी धम्माल, मस्ती करण्याची पर्वणीच. सुट्टय़ांमध्ये लहान मुले मनसोक्त खेळतात आणि बागडतात. अशातच त्यांच्या सुट्टय़ा अधिक रंगतदार करण्यासाठी दिग्दर्शक विजू माने ‘मंकी बात’ हय़ा बालचित्रपटातील नुकतेच  श्या… कुठे येऊन पडलो यार….श्या…!! हे गाणे रिलीज झाले असून हे गाणे अल्पावधीत मुलांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरले आहे. जरा काही आवडेनासं झालं की श्या… म्हणत कंठ काढताना आपण लहान मुलांना बघितले असेल. मंकी बातमधील वायू मुंबई शहरात येण्यापूर्वी मस्त कोल्हापुरात राहायचा. तेथील जिवलग मित्रांचा सहवास आणि सोबतीला नदी, दऱया, डोंगर होता. या सर्व गोष्टीत तो रमून जायचा. नयनरम्य निसर्ग आणि बागडण्यासाठी त्याला पूर्ण रान मोकळं होतं. शहरात आल्यानंतर मात्र मर्यादित जागेचं आयुष्य त्याला आवडेनासं झालं. त्याचाशी कुणी लवकर गट्टी करेना, कुणी सोबत खेळू देईना. शिवाय शाळेतही जीवाला खाणारा एकटेपणा आहेच. यामुळे वायू म्हणतोय श्या… कुठे येऊन पडलो यार…!!

प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांची मंकी बात ही कलाकृती लहान मुलांसाठी उन्हाळय़ाच्या सुट्टय़ांमधली खास मेजवानी ठरणार आहे. निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची प्रस्तुती आकाश पेंढारकर, विनोद सातव, अभय ठाकूर, प्रसाद चव्हाण, शंकर कोंडे यांची असून विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू आणि विजू माने निर्माते आहेत. चित्रपटाची गीते आणि संवाद संदीप खरे यांचे तर  संगीत डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिले आहे. मंकी बातमध्ये बाल कलाकार वेदांत, पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांची आहे. खास बच्चे कंपनीसाठी उन्हाळय़ाच्या सुट्टीत येणारा हा चित्रपट येत्या 18 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related posts: