|Friday, March 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वेणुनादाचे मनावर परिणाम

वेणुनादाचे मनावर परिणाम 

एक गोपी म्हणते-अग सखी! पहा तर खरी! बासरीचे सूर ऐकून हें वृक्ष देखील मदस्त्राव करीत आहेत. कन्हैयाच्या बासरीवादनाने वृक्षांना देखील आनंद होत आहे. त्यांच्या मुलीचें परमात्म्याशी लग्न लागले आहे.

एक संत म्हणतात कीं, हे दु:खाने रडत आहेत. तें समजतात, बासाचे (बांबूचे) मुख्य काम छत बनून परोपकार करण्याचे आहे. पण ही बासरी बनून हा तर घरें उजाड करीत आहे. कृष्णाच्या बासरीची धून जो कोणी ऐकतो त्याचें घरांत राहायला मनच लागत नाही. तो राधेश्याम राधेश्याम म्हणत म्हणत कृष्णमीलनाच्या ध्यासाने घराच्या बाहेर निघून जातो. आमच्या ह्या कान्हय़ाने घरांचे रक्षण करण्याऐवजी त्यांना उजाड करण्याचें काम सुरू केले आहे. या विचाराने सगळेच वृक्ष शोकाकुल होऊन अश्रू ढाळत आहेत. दुसरे एक संत म्हणतात कीं, हे वृक्ष असा विचार करीत आहेत कीं पाण्यांत बुडणाऱया लोकांना वाचवावयाचे आपले जातिगत काम सोडून बासरी सगळय़ांनाच आनंद रसांत बुडविण्यात मग्न झाली आहे.

एक गोपी म्हणते-अग सखे! पहा तर खरं! कन्हैयाचे बासरीवादन ऐकून हरिणी वेडय़ा होऊन धावत आल्या आहेत आणि पापणी न हलविता टक लावून कृष्णाकडे पाहत आहेत. हरिणी आपल्या पतीलासुद्धा प्रभूच्या समोर घेऊन जाते. तिचा पति तिला साथ देतो. हिचा पति अनुकूल आहे तर माझा पति देवसेवेला प्रतिकूल आहे, आणखी अधिक मी काय सांगू? माझ्यापेक्षा या हरिणी धन्य आहेत. आपले नयनकमल वाहून कृष्णाची पूजा करीत आहेत म्हणून भाग्यशाली पण आहेत. आणखी काही पूजा सामुग्री त्यांच्यापाशी नाहीच. पति पत्नी एक होऊन जर पूजा करतील तर भगवंत लवकर प्रसन्न होतील. सहकृष्णसारा:! अर्थात पतीला सत्संगात, परमात्म्याच्या निकट घेऊन जाणारी हरिणी खऱया अर्थाने पत्नी आहे. पतीला परमात्म्याच्या सान्निध्यात घेऊन जाणारी, पतीकडून सत्कर्म करविणारी पत्नी पतीची मैत्रिण आहे. पतीला केवळ भोगविलासात बुडवून ठेवणारी पत्नी पतीची शत्रु आहे. कृष्णसेवेंत हरिणींना त्यांचे पति सहयोग देतात. आणि इकडे आमचे पति सहयोग तर देतच नाहीत, परंतु बाधाच उपस्थित करतात. म्हणून या हरिणी फार भाग्यवान आहेत. सखे! मी तुला काय सांगू? बंसीनाद ऐकल्याबरोबर गोमाता चारा खाण्याचे सोडून आपल्या कानरूपी द्रोणातून बासरीच्या नादामृताचें अत्यंत आनंदाने पान करू लागतात. भगवंताची प्रेमरसांत ओथंबलेली बासरीची तान ऐकून गाई चारा खाणे विसरून जाऊन आनंदाश्रू ढाळू लागतात. वासरें देखील दूध पिणें विसरून जातात. कन्हैयाचें बासरीवादन मनुष्य, पशू, पक्षी, वृक्ष सगळेच शांतपणे ऐकतात. वृंदावनातील वन्य सृष्टी दिव्य आहे. कान्हा जेव्हा बासरी वाजवू लागतो तेव्हा पक्षी देखील शांत होतात. कित्येक ऋषिसुद्धा पक्ष्यांचे रूप घेऊन वृंदावनाच्या लीलानिकुंजात राधेश्याम राधेश्याम करीत इकडे तिकडे उडत फिरतात. हे पक्षी तहान लागल्यावर सुद्धा राधेश्यामाचा जप करीत पाणी प्यायला जातात.

– ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: