|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचे निधन

लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचे निधन 

ऑनलाईन टीम / सातारा :

प्रसिद्ध लावणी गायिका यमुनाबाई वाईकर यांचे आज सकाळी वाई येथे 11 वाजता निधन झाले आहे. यमुनाबाई वाईकर 102 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरविल्यामुळे त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्यांना आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यमुनाबाईंचे मूळ नाव यमुना विक्रम जावळे होते. त्या राहत असलेली वाईची ही कोल्हाटी समाजाची वस्ती म्हणजे एक लोककलेचे माहेरच होते. यमुनाबाई दहा वर्षाच्या असतानाच आपल्या दोन लहान बहिणींना घेऊन गावोगाव तमाशाच्या फडाबरोबर हिंडू लागल्या. रंगू-गंगू सातारकर यांच्याकडे त्यांना तमाशातले गाणे आणि अभिनयाची अदाकारी याचे धडे मिळत राहिले. मराठी लोकसंस्कृतीचा एक धागा असलेल्या तमाशा या कलाप्रकाराला उत्युच्च स्थानी नेऊन ठेवणाऱया यमुनाबाई वाईकर या बऱयाच दिवसापासून आजारी होत्या. त्यांच्यावर वाई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यमुनाबाई यांचा जन्म 31 डिसेंबर 1915 रोजी वाई येथे झाला होता. घरातच त्यांना लावणी व तमाशाचे बाळकडू मिळाले होते. वयाच्या 15 व्या वषी त्यांनी स्वतःचा तमाशा फड काढला होता. यमुना-हिरा-तारा वाईकर संगीत पार्टी अशा नावाने यमुनाबाईंनी आपल्या लावणीच्या जोरावर आख्खा महाराष्ट्र गाजवला. महाराष्ट्रात गाजलेल्या अनेक फक्कड लावण्या त्यांनी तयार केल्या. ठुमरी, तराणा, गझल आदी संगीतप्रकार त्या सहजतेने गात असत. त्यांची दखल घेवून महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी परिषद पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लावणी सम्राज्ञी पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, संगीत क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमी ऍवार्ड व देशातील अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱया पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे. तमाशा क्षेत्राला एक वेगळा आयाम देण्याचे काम यमुनाबाई वाईकर यांनी केलेले आहे. अशा या सातारच्या भूमितील थोर लावणीसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड झाल्यामुळे अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. कृष्णाकाठच्या या कलासाधिकेने आपले संपूर्ण आयुष्यच कलेसाठी अर्पण केले होते. आयुष्यात आलेल्या अनेक खडतर मार्गांना, प्रसंगांना अतिशय समर्थतेने तोंड देत त्यांनी आपल्या कलेची जोपासना केली.

Related posts: