|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे निधन

लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे निधन 

प्रतिनिधी/ वाई

वयाच्या 10 व्या वर्षी पायात चाळ बांधून नृत्य करणाऱया आणि आपल्या गोड गळ्य़ाने प्रसिद्ध झालेल्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे वयाच्या 102 व्या वर्षी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. लावणी क्षेत्रातील पद्मश्री या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

 कृष्णाकाठच्या या यमुनेने आपले उभे आयुष्य कलेसाठी अर्पण केले होते. त्यांच्या पश्चात भावाच्या मुली लता, कल्पना या नामवंत नर्तिका, पुतणे व त्यांच्या पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

लहानपणापासून तमाशाच्या माध्यमातून समस्त रसिकांचे मनोरंजन करणाऱया यमुनाबाईंनी यमुना तारा हिरा तमाशा पार्टी काढून संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. तारा आणि हिरा या त्यांच्या बहिणी नृत्य आणि गायनात प्रसिद्ध होत्या. तर, अदाकारीच्या माध्यमातून बालेघाटी लावणी सादर करणाऱया या तत्कालीन एकमेव कलाकार होत्या. हुमरी तराना गझल या संगीत प्रकारांतही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना जवळजवळ 22 पुरस्कार मिळाले असून त्यात wwwपद्मश्री पुरस्कारासह संगीत नाटक ऍपॅडमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, आदित्य विक्रम बिर्ला पुरस्कार, रवींद्रनाथ टागोर, देवी अहिल्या सन्मान मध्यप्रदेश, साहित्य संस्कृती गौरववृत्ती कला पुरस्कार, ई टी. व्ही. मराठी कलासम्राज्ञी पुरस्कार, सातारा भूषण पुरस्कार, वाई भूषण पुरस्कार या महत्त्वाच्या पुरस्कारांचा समावेश आहे.

 त्यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन असंख्य वाईकरांनी या गानसम्राज्ञीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्या पद्मश्रीप्राप्त कलाकार असल्याने त्यांचा दफनविधी शासकीय इतमामात येथील सोनगिरवाडीच्या बुधनगरनजिकच्या स्मशानभूमीत बुधवारी सकाळी 10 वाजता केला जाणार आहे. यमुनाबाईंच्या जाण्याने लावणी क्षेत्रातील असंख्य कलाकारांच्या मार्गदर्शिका काळाच्या पडद्याआड गेल्याने त्या कलाकारांनी शोक व्यक्त केला.

 

 

Related posts: