|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगली, मिरज परिसरात दमदार पाऊस

सांगली, मिरज परिसरात दमदार पाऊस 

प्रतिनिधी/ सांगली

विजांचा कडकडाट आणि गारांसह मंगळवारी सांगली, मिरज परिसराला सायंकाळी वळवाच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. अर्धा तासहून अधिक पडलेल्या पावसाने शहरात पाणीच पाणी केले. उकाडय़ाने हैराण झालेल्या शहरवासियांना यामुळे दिलासा मिळाला. दरम्यान, दिवसभर वेजेचा लंपडाव पाहायला मिळाला. त्यामुळे शहारातील पाणीपुरवठय़ावर याचा चांगलाच परिणाम झाला.

मंगळवारी दिवसभर उकाडा होता. सायंकाळी सातनंतर अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमून आले आणि बघता-बघता विजांच्या कडकडाटासह वळवाच्या पावसाला सुरूवात झाली. मिरजेत गारांसह जोराचा पाऊस पडला. शहरात सर्वत्र पाणीच पाणी केले. वादळ आणि गारांमुळे धावपळ उडाली. भाजी विक्रेते आणि प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली. अनेक विक्रेत्यांची भाजी पावसात भिजली. पावसाने शहरातील शिवाजी मंडई परिसर, स्टेशन रोड, स्टँड परिसर, मारूती रोड आदी परिसरातील सखल भागातील रस्त्यावर पाणी गोळा झाले.

मंडईमध्ये तर गुडघाभर पाणी आले. डेनेजचे काम करूनही पावसाच्या पाण्याचा निचरा गतीने होत नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी ड्रेनेज चोकअप झाल्याने पाणी रस्त्यावरच थांबून राहिले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. मिरज शहरासह पूर्व भागातील काही गावात रात्री साडेसातच्या सुमारास गारासह दमदार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले.

विजेचा लंपडाव, पाणीपुरवठय़ावर परिणाम

मंगळवारी दिवसभर शहरामध्ये विजेचा लंपडाव सुरु होता. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत होता. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. वीज पुरवठा खंडीत का केला आहे, याबाबत महावितरणकडून कोणतही सूचना देण्यात आली नव्हती. यामुळे नागरिक उकाडय़ाने हैराण झाले. याशिवाय मनपा पाणीपुरवठा विभागाचे पंप बंद राहिल्याने नदीतून पाणी उचलेले गेले नाही. परिणामी बुधवारी शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. मंगळवारीही शहरात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली.

Related posts: