|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दुष्काळमुक्तीसाठी जलसंधारणच समर्थ पर्याय

दुष्काळमुक्तीसाठी जलसंधारणच समर्थ पर्याय 

प्रतिनिधी/ जत

राज्यातील दुष्काळमुक्तीसाठी मोठी धरणं आवश्यक असली तरी कायमचा दुष्काळ हटवण्यासाठी जलसंधारण हाच समर्थ पर्याय आहे. राज्य शासन गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार हे मिशन घेऊन काम करीत आहे. आजवर अकरा हजार गावे दुष्काळमुक्त तथा टँकरमुक्त झाली आहेत. 2019 पर्यंत वीस हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प पूर्णत्वास जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले.

पाणी फौंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे साकारली जात आहेत. जत तालुक्यात 106 गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या मिशनकडे पाहिले जात आहे. त्यादृष्टीने जत तालुक्यातही मोठय़ा प्रमाणात कामे सुरू आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील आवंढी आणि बागलवाडी येथील कामांची पाहणी करून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधला. महीला, तरूण, तरूणी, अबालवृध्द यांचा या कामातील लोकसहभाग पाहून खुद्द मुख्यमंत्री भारावून गेले. त्यांनीही या दोन गावात श्रमदान करीत आणखीन पेरणा दिली.

यावेळी आमदार विलासराव जगताप, आ. सुरेश खाडे, जि. प. अध्यक्ष संग्राम देशमुख, काँग्रेस नेते विक्रमदादा सावंत, सौ. नीता केळकर, गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज देशमुख, तम्मणगौडा रवी, सभापती सौ. मंगलताई जमदाडे, प्रकाशराव जमदाडे, प्रभाकर जाधव, सरदार पाटील, बाबासाहेब कोडग, डॉ. रवींद्र आरळी, ऍड. श्रीपाद अष्टेकर, चंद्रकांत गुड्डोडगी, पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील, अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, एच. व्ही. गुणाले, राजेंद्र साबळे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याचा पन्नास टक्के भाग दुष्काळी आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना सत्यात आणण्याऐवजी आमच्यात एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा असा प्रकार झाल्याने दुष्काळ हटला नाही. परंतु भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून आम्ही जलयुक्त शिवारच्या माध्यमातून एक मिशन म्हणून हा प्रकल्प हाती घेतला. राज्यात गेल्या तीन वर्षांपासून जलसंधारणावर मोठे काम सुरू आहे.

आज राज्यातील 11 हजार गावे टँकरमुक्त झाली आहेत. येत्या दोन महिन्यात आणखीन सहा हजार गावे टँकरमुक्त होतील. तसेच पुढच्या 2019 पर्यंत 20 हजार गावे टँकरमुक्त करण्याचा संकल्प आहे.

लोकचळवळ उभी राहिली

सुरूवातीस हे मिशन साकारताना अनेक अडचणी दिसत होत्या. परंतु पाणी फौंडेशन, सामाजिक संस्था, राज्य शासन, लोकसहभाग यामुळे दरवर्षी या मिशनला मोठे पाठबळ मिळत गेले. त्याचेच फलित म्हणून आज राज्यातील अनेक दुष्काळी भागात जलसंधारणाची चांगली कामे साकारली गेली. अनेक लोक उत्स्फूर्तपणे आपल्या गावच्या जलसमृद्धीसाठी पुढे येत आहेत. खऱया अर्थांनी या मिशनला आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शिवाय अशी गावे पाहताना मला खूप समाधान वाटत असल्याचे भावूक उद्गारही त्यांनी काढले.

थेंबन्थेंब जिरवा

खरेतर आपल्या गावच्या शिवारात पडणाऱया पाण्याचा थेंबन्थेंब जिरला पाहिजे. यावर आपला हक्क आहे. म्हणूनच ही योजना जितक्या प्रभावीपणे राबवता येईल त्याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्यात आजवर कधीही इतके मोठे काम साकारले नाही, तितके काम गेल्या तीन वर्षात झाले आहे. आज जतच्या आवंढी आणि बागलवाडीचा विचार करता येत्या काळात ही गावे नक्कीच जलसाक्षर असतील यात शंका नाही. लोकांना पाणी मुरवण्याचा विचार पटला आहे. आपल्या गावावर आलेले संकट दूर करण्यास आपणच पुढाकार घेतला पाहिजे असे सांगून या कामांना राज्य शासन हवी तितकी मदत करण्यास मागे पुढे पाहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोठी धरणं म्हणजे दुष्काळमुक्ती नव्हे

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मोठी धरणं उभी करून सिंचन करणे म्हणजे दुष्काळमुक्ती नव्हे. यासाठी जलसंधारणच सक्षम पर्याय आहे. कारण माथ्यापासून पायाथ्यापर्यंत वैज्ञानिक शास्त्रानुसार ही कामे साकारली जातात. यात पाण्याचा प्रत्येक थेंब अडला जातो. ज्याचा परिणाम भूगर्भातील पाण्याची पातळी समतोल राहण्यास मदत होते. मोठी धरणंही हवीत. पण, कायमच्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणावर भर द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

आवंढी, बागलवाडीकरांचे कौतुक

आवंढी व बालगवाडीकरांनी या योजनेत केलेल्या कामांची पाहणी आणि लोकसहभाग पाहून मुख्यमंत्री भारावून गेले. त्यांनी आवंढीचे सरपंच अण्णासाहेब कोडग, प्रदीप कोडग, बालगवाडीचे सरपंच सौ. लक्ष्मी खांडेकर यांच्यासह गावकऱयांचे विशेष अभिनंदन केले. तसेच आमदार विलासराव जगताप यांचेही कौतुक केले.

बागलवाडीच्या तलावाचे काम मार्गी लावू

बागलवाडीतील प्रलंबित साठवण तलाव पूर्ण करण्याची मागणी गावकऱयांनी करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातच प्रशासनाला साठवण तलावाच्या अडचणी व अहवाल तातडीने देण्याचे आदेश दिले. हे काम मार्गी न लागल्यास गावकऱयांनी थेट माझ्याकडे यावे असेही सांगितले. या निर्णयाचे गावकऱयांनी स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांचे प्रबोधन

दुष्काळ हटवासाठी मुख्यमंत्र्यांच्या भावना फारच गंभीर असल्याचे दिसून आले. त्यांनी आवंढी, बागलवाडीत पाणी या विषयावर आपल्या संवादात खूप चांगले प्रबोधन केले. जलसंधारण दुष्काळमुक्तीसाठी किती उपयुक्त आहे, याची वैज्ञानिक माहीती देत ही लोकचळवळ सातत्याने सुरू राहिल्यास भविष्यात महाराष्ट्र जलसमृद्धीत अग्रेसर असेल असा विश्वास त्यांनी गावकऱयांना दिला. शिवाय राज्यात अनेक गावे यासाठी खूप मेहनत घेत आहेत, आपणही यात मागे राहू नये. कारण निसर्गाकडून आपण काही घेताना आपण काही देण्याची भूमिका आणि मानसिकता ठेवली पाहिजे असेही ते म्हणाले.