|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मंडणगड नगराध्यक्षपदी नेत्रा शेरे बिनविरोध

मंडणगड नगराध्यक्षपदी नेत्रा शेरे बिनविरोध 

रंगतदार लढतीत शहर विकास आघाडीचे राहुल कोकाटे यांची उपनगराध्यक्षपदी दुसऱयांदा वर्णी

 

प्रतिनिधी /मंडणगड

प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नगरपंचायतीच्या सभागृहात गुरूवारी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी महाआघाडीच्यावतीने नेत्रा शेरे व उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे राहुल कोकाटे यांची निवड करण्यात आली.

नगराध्यक्षपदासाठी 18 मे पासून निवड प्रक्रियेस सुरुवात झाली होती. महाआघाडीच्यावतीने या पदासाठी नगरसेविका नेत्रा शेरे यांचा केवळ एकच अर्ज भरण्यात आलेला असल्याने निवडीची औपचारिकता बाकी होती. त्याप्रमाणे नगराध्यक्ष निवडीचे सोपस्कार पूर्ण होऊन शेरे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध वर्णी लागली. तसेच गुरूवारी उपनगराध्यक्षपदासाठी महाआघाडीच्यावतीने स्नेहल मांढरे, तर शहर विकास आघाडीच्यावतीने विद्यमान उपनगराध्यक्ष राहुल कोकाटे यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले होते. मात्र या निवडीवेळी राष्ट्रवादीच्या 6 नगरसेवकांनी शहर विकास आघाडीच्या उमेदवारास मतदान केल्याने शहर विकास आघाडीच्या उमेदवारास 10 मते मिळाली, तर काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारास 6 मते मिळाली. यामुळे कोकाटे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली.

आठ महिन्यांपूर्वी काँग्रेसपासून फारकत घेऊन पार्टीच्या चार नगरसेवकांनी शहर विकास आघाडीच्या नावाने नगरपंचायतीत वेगळा गट व गटनेता नेमून खळबळ उडवून देत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आपला स्वतःचा उपनगराध्यक्ष बसवला होता. त्यावेळी आघाडीचा धर्म न पाळल्याबद्दल काँग्रेसकडून जोरदार टीकाही झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी या खेपेस तरी आघाडीचा धर्म पाळते का, याविषयी सहकारी पक्षांना मोठी उत्सुकता होती. गेल्या तीन-चार दिवसांच्या घडामोडीतून राष्ट्रवादीचे नगरसेवक आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे संकेतही मिळत होते. मात्र प्रत्यक्ष निवडीवेळी आज वेगळे चित्र दिसले. निवडणुकीसंदर्भात विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हात वर करुन निवडणूक घेण्यात आली. त्यात शहर विकास आघाडीची मतसंख्या केवळ चार असल्याने केवळ औपचारिकता पूर्ण करुन काँग्रसेचा उमेदवार विजयी होणार हे स्पष्ट होते. प्रत्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीच्या 6 नगरसेवकांनी शहर विकास आघाडीच्या उमेदवारास मतदान केल्याने शहर विकास आघाडीच्या उमेदवारास दहा मते मिळाली, तर काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारास 6 मते मिळाली. नगरसेवक राजेश मर्चंडे या निवड प्रक्रियेस गैरहजर होते. या संदर्भात दिवसभर राजकारणातील डाव-प्रतिडाव सुरु असले तरी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण दिसून आले. यावेळी मुख्याधिकारी कविता बोरकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं या पक्षांचे शहरातील स्थानिक नेते व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसच्या उमेदवाराची हार ही महाआघाडीचाच पराभवः मिरकर

उपनराध्यक्षांच्या निवडीवेळी काँग्रेसच्या उमेदवार स्नेहल मांढरे यांचा झालेला पराभव हा राष्ट्रवादी प्रणित महाआघाडीचा पराभव असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर यांनी निवडीनंतर पत्रकारांना दिली. महाआघाडीच्या समन्वय समितीत आधी विषय झालेले असताना व आमदारांनी मतदान करण्याचा शब्द दिलेला असतानाही निवडीवेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी क्रॉस व्होटींग केले. त्यामुळे दहा विरुध्द सहा अशा फरकाने काँग्रेसच्या उमेदवारास पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीकडूनच आघाडीचा धर्म पाळला गेलेला नसताना शिवसेनेच्या एकमेव नगरसेविकेने काँग्रेसच्या उमेदवारास मतदान करत दिलेला शब्द पाळल्याने मिरकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. काँग्रेसने वेळोवेळी आघाडीचा धर्म पाळला असला तरी राष्ट्रवादीने वेळोवेळी गद्दारी केली आहे. त्यामुळे आघाडीच्या तालुक्यातील भविष्यातील राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे संकते यावेळी दिले.

काही नगरसेवकांनी पक्षादेश धुडकावलाः सुभाष सापटे

आमदार संजय कदम यांनी सांगितल्याप्रमाणे व पक्षाच्या आदेशाप्रमाणे काँग्रेस आघाडीच्या उमेदवार स्नेहल मांढरे यांना उपनगराध्यक्ष करण्यासाठी मतदान करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र काही नगरसेविकांनी आयत्यावेळी पक्षाच्या आदेशाविरोधात भूमिका घेत विरोधी उमेदवारास मतदान केल्याने महाआघाडीच्या उमेदवारास पराभवाला समोर जावे लागले असल्याचे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुभाष सापटे यांनी विरोधात मतदान करणाऱया नगरसेवकांवर कारवाई वा अन्य विषयांवर त्यांनी यावेळी भाष्य केले नाही.

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजीनाम्याच्या पवित्र्यात

दरम्यान, गुरूवारच्या निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष वैभव कोकाटे यांचा कोठेही सहभाग आढळून आला नाही. या संदर्भात त्यांना विचारणा केली असता निवडणूक प्रक्रियेत पार्टीने आपल्याला कोठेही सहभागी करुन न घेतल्याने आपण पदाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांना दिली.