|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आपण नाणारवासियांच्या सोबतच

आपण नाणारवासियांच्या सोबतच 

राज ठाकरे यांची रिफायनरी प्रकल्पग्रस्तांना ग्वाही

प्रतिनिधी /राजापूर

नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प होवू देणार नाही, नाणारचा विषय आता संपलाय अशी सत्तेत असणाऱया शिवसेनेची भूमिका असताना शासन हा प्रकल्प रेटवून नेण्याचा प्रयत्न कसा काय करीत आहे, असा सवाल करत या बाबतचे प्रश्न शिवसेनेचे पक्षप्रमुख व सेनेच्या त्यांच्या लोकप्रतिनिधींनाच विचारा, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. मात्र आपण नाणारवासियांच्या सोबत राहू व या प्रकल्पाबाबत पुढे काय करायचे त्याचा लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही त्यांच्या भेटीसाठी गेलेल्या रिफायनरी प्रकल्पग्रस्तांना दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संघटनात्मक पातळीवरील राज्यव्यापी दौरा सुरु असून गुरुवारी ते राजापुरात आले होते. यावेळी महामार्गावरील गुरुमाऊली हॉटेलवर त्यांची नाणार प्रकल्पग्रस्तांनी भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या भूमिकेवरच त्यांनी सवाल उपस्थित केले. यावेळी त्यांनी सेनेच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प होवू देणार नाही, नाणारचा विषय आता संपलाय असे शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितले असताना शासन हा प्रकल्प कसा काय रेटवून नेण्याचा प्रयत्न करते, असा तिरकस सवाल त्यांनी केला.

यावेळी नाणारवासियांच्या शिवसेनेकडून अपेक्षा होत्या. मात्र त्या पूर्ण न झाल्याने आता मनसे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार का, असे विचारले असता आम्ही नाणारवासियांच्या समवेत आहोत. आता या प्रकल्पाचे पुढे कसे करायचे ते आमच्या पदाधिकाऱयांशी चर्चा करुन ठरवू, असे ते म्हणाले.

प्रकल्पाविरोधात मोर्चाला ठाकरेंचा पाठिंबा

यावेळी भूमी कन्या एकता मंचाच्यावतीने रिफायनरी प्रकल्पाविरोधात राज ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी 30 मे रोजी भूमी कन्या एकता मंचाच्यावतीने काढण्यात येणाऱया रिफायनरी प्रकल्पाविरोधात मोर्चाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.