|Monday, July 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » सस्पेन्स, थ्रिलरचा खेळ मस्का

सस्पेन्स, थ्रिलरचा खेळ मस्का 

धम्माल विनोदासह सस्पेन्स आणि थ्रिलरचा तडका असलेल्या अमोल जोशी प्रोडक्शन्स आणि स्वरूप रिक्रीएशन्स ऍन्ड मीडिया प्रा. लि. प्रस्तुत तसेच मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित आगामी ‘मस्का’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा  मुंबई येथे दिमाखदार सोहळय़ात मोठय़ा उत्साहात पार पडला.

 अभिनेता, नाटय़ दिग्दर्शक अशी ओळख असलेला प्रियदर्शन जाधव ‘मस्का’मधून चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. या सोहळ्याला अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासराव, चिन्मय मांडलेकर, प्रणव रावराणे, शशांक शेंडे आणि विद्याधर जोशी, संगीतकार चिनार आणि महेश, गायक महालक्ष्मी अय्यर, अवधूत गुप्ते, गणेश चंदनशिवे, गीतकार मंगेश कांगणे, व्हिडीओ पॅलेसचे नानूबाई सिंघानी,  निर्माते प्रशांत पाटील, प्रस्तुतकर्ते सचिन नारकर, विकास पवार, आकाश पेंढारकर, विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मस्का’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनिकेत विश्वासराव हा काहीसा हतबल दिसत असून शशांक शेंडे हे कधी चिंतीत तर कधी नाटय़मय प्रसंगात दिसत आहेत. तर प्रणव रावराणे हा एक स्पेशल चाईल्ड असल्याचे दिसते. तसेच चिन्मय मांडलेकर पहिल्यांदाच विनोदी शैलीत दिसणार आहे, आजवर अनेक चित्रपटातून सोज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रथमच हटके अशा बोल्ड अंदाजमध्ये पडद्यावर बघायला मिळेल.

चित्रपटाच्या ट्रेलर सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळाला असून मस्का चित्रपटातील गाणी देखील अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. गणेश चंदनशिवे यांनी गायलेले ‘बया’ गाणे तरुणाईने चांगलेच डोक्यावर घेतले आहे तर ‘चला पटकन पकडा पोकेमॉन’ या गाण्याचीही तरुणाईला भुरळ पडल्याचे दिसते. मस्काचे प्रशांत  पाटील निर्माते आहेत, तर प्रस्तुतकर्ता सायली जोशी, सचिन नारकर, विकास पवार आणि सहप्रस्तुतकर्ता आकाश पेंढारकर आणि विनोद सताव आहेत. अत्यंत हटके विषयावरील सस्पेन्स, थ्रीलर आणि कॉमेडी अशा मनोरंजनाने परिपूर्ण असलेला ‘मस्का’ हा चित्रपट येत्या 1 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.