|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गोरगरीब रुग्णांची परवड थांबेल

गोरगरीब रुग्णांची परवड थांबेल 

लाईफ टाईम हॉस्पिटल उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांना विश्वास

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

ज्या कोकणी जनतेने नारायण राणे यांना मोठं केलं त्या जनतेची उतराई करण्याचे काम त्यांनी लाईफ टाईम हॉस्पिटलच्या उभारणीतून केले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल उभारले असले तरी त्याकडे व्यवसाय म्हणून न पाहता जनतेला दर्जेदार सेवा देण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येथील जनतेला गोवा किंवा मुंबईला जावे न लागता इथेच उपचार मिळणार आहेत. त्यामुळे गोरगरीब जनतेची परवड थांबेल. शासनाच्या योजनाही या हॉस्पिटलला लागू केल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी येथे केले.

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या पडवे येथे उभारण्यात आलेल्या 650 बेडेड लाईफ टाईम हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री फडवणीस यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंधारण राज्यमंत्री राम शिंदे, जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी मंत्री सुनील तटकरे, गोव्याचे मंत्री जयंत साळगावकर, माजी खासदार रमाकांत खलप, आमदार अनिकेत तटकरे, कृपाशंकर सिंह, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, नीलम राणे, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, अशोक सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.आर.एस.कुलकर्णी आदी मान्यवरांसह विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

लवकरच मेडिकल कॉलेजला मंजुरी

मुख्यमंत्री फडवणीस पुढे म्हणाले की, राणे यांनी ग्रामीण भागासारख्या ठिकाणी अतिशय सुसज्ज असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल उभारले आहे. त्यामुळे आता या भागातील लोकांना उपचारासाठी गोवा, पुणे, मुंबईत जावे लागणार नाही. उलट गोव्यातील लोकच इथे येतील. 650 बेडचे हॉस्पिटल गावात उभारणे म्हणजे धाडसाचेच काम आहे. असे धाडस राणेच करू शकतात. हेच हॉस्पिटल मुंबईत उभारलं असतं तर कोटय़वधी रुपयांचा क्यवसाय झाला असता. सेवा देणे किंवा बिझनेस करणे या दोन प्रवृत्ती असतात. परंतु राणेंनी बिझनेसपेक्षा येथील जनतेची उतराई म्हणून सेवा देण्यासाठी ग्रामीण भागात हॉस्पिटल उभारले आहे. हॉस्पिटलचे प्रत्येक काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले आहे. प्रत्येक मशिनमध्ये जगातले प्रगत तंत्रज्ञान वापरलेले आहे. त्यामुळे कोकणातील जनतेला आता कुठे जावे लागणार नाही. लवकरच मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळेल.

मुख्यमंत्री आरोग्य सेवा निधी

गोरगरीब जनतेची परवड होऊ न देता चांगली माफक दरात सेवा देत असतांना मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून विदेशातून रुग्ण येतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होऊ शकेल. महात्मा फुले आरोग्य योजना शासनाने सुरू केलेली आहे ही योजना या हॉस्पिटलला लागू केली जाईल. या हॉस्पिटलमध्ये खास गरिबांसाठी 20 खाटा राखीव ठेवल्या आहेत. गरीब रुग्णांना मुख्यमंत्री आरोग्य सेवा निधीतून मदत केली जाणार आहे. आतापर्यंत 37 हजार रुग्णांना अशी मदत केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील 50 कोटी जनतेच्या आरोग्यासाठी पाच लाखापर्यंत वैयक्तिक स्तरावर मदत दिली जाणार आहे. त्यामुळे यापुढे गरीब, गरजू लोक उपचाराविना राहणार नाहीत. इथेच चांगले उपचार होतील, असेही मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले.

देशातील महत्वाचे आरोग्य केंद्र बनेल- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, अतिशय सुसज्ज असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात निश्चितपणे लाईफ टाईम हॉस्पिटल राज्याचेच नव्हे तर देशातील महत्वाचे आरोग्य केंद्र बनेल. तसेच इथे लूटमारही होणार नाही. मात्र, खासगी हॉस्पिटल असल्याने जनतेनेही वैद्यकीय खर्च जमेल तसा दिला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

हॉस्पिटलचे रचना एवढी आहे की चोहोबाजूंनी हिरवागार निसर्ग आहे. त्यामुळे येणारा रुग्ण निसर्ग पाहूनच 50 टक्के बरा होतो. या हॉस्पिटलमध्ये 150 पेक्षा अधिक डॉक्टर्स, चार हजार नर्स असणार आहेत. त्यामुळे आरोग्यविषयक सुविधा देणारे जणू एक गावच तयार झाल्याचे पवार म्हणाले.

येथील जनतेत स्पष्टवक्तेपणा आहे. मनोभावे प्रेम करणारा पण तेवढाच चिकित्सक असा कोकणी माणूस आहे. तो पटलं तर हवी ती मदत करणार. नाही तर खरं नाही, असा त्याचा स्वभाव आहे. येथील जनतेने फळझाड लागवड करून मोठय़ा बागायती निर्माण केल्या. आर्थिक चलन निर्माण केले. आता रोजगार हमी योजनेतून फळझाड लागवडीबरोबरच बांबू लागवड करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.

शरद पवारांची मिश्किल शैली

शरद पवार त्यांच्या मिश्किल शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. यावेळीही त्यांनी राणेंना चिमटे काढायची संधी सोडली नाही. पवार म्हणाले, “राणे साहेब आता तुम्ही आमचे विरोधक आहात. त्यामुळे संघर्ष तर होणारच. मात्र, संघर्षानंतर कुठे लांब जायची गरज नाही. तुम्ही इथेच चांगली व्यवस्था करून ठेवली आहे. हा गंमतीचा भाग असला तरी तुम्ही कुणालाही हॉस्पिटलमधून ठणठणीत केल्याशिवाय सोडणार नाही, हेदेखील तेवढंच खरे आहे!’’ त्यांच्या या वक्तव्याला सर्वांनीच टाळय़ा वाजवून दाद दिली.

कोकणी जनतेचे आशास्थान – चंद्रकांत पाटील

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पूर्ण कोकणात अशाप्रकारचे हॉस्पिटल कुठेच झालेले नाही. खूप सूंदर आणि सुसज्ज असे हॉस्पिटल उभारलेले आहे. त्यामुळे कुणी आजारी पडावं म्हणून नव्हे तर निदान एक दिवस तरी इथे येऊन उपचार घ्यावेत, असे वाटते. नारायण राणे कुठलीही गोष्ट भव्यदिव्य आणि अतिशय सुंदर करतात. तशाच प्रकारे हॉस्पिटल उभारले आहे. त्यामुळे कोकणी जनतेसाठी आशास्थान निर्माण झाले आहे.

कृतज्ञतेसाठी हॉस्पिटल- नारायण राणे

प्रास्ताविकात खासदार राणे म्हणाले की सिंधुदुर्गात रुग्णांची फार गैरसोय होते. गोवा किंवा मुंबईला उपचारासाठी न्यावे लागते. आपल्या वडिलांचे 52 व्या वर्षी निधन झाले. त्यांनाही मुंबईला न्यावे लागायचे. त्यामुळे आपल्याला सहावेळा निवडून देणाऱया जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हॉस्पिटल उभारले. मातीशी असलेले प्रेम आणि कृतज्ञतेच्या भावनेतूनच हे हॉस्पिटल उभारले आहे. येणारा
प्रत्येक रुग्ण ठणठणीत होईल, त्याचवेळी राणे कुटुंबियांना आनंद होईल. मेडिकल टुरिझम इथे सुरू केले जाणार असून कुठल्याही रुग्णाची परवड होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत नारायण राणे यांनी केले. आभार आमदार नीतेश राणे यांनी मानले. सूत्रसंचालन ऋषी देसाई यांनी केले.

विविध पक्षातील लोकांची उपस्थिती

आजच्या कार्यक्रमाला शिवसेना वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. माजी आमदार पुष्पसेन सावंत आवर्जुन उपस्थित होते. कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी पाहत होते. प्रवेशद्वारावर गुढय़ा उभारण्यात आल्या होत्या. तर मान्यवरांच्या स्वागतासाठी मालवण येथून स्वाभिमानी महिला संघाचे ढोलपथक आले होते.